मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. मालिका 2-0 ने खिशात तर घातली, त्याचबरोबर वर्ल्डकप स्पर्धेसाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून वनडेत फ्लॉप ठरलेल्या सूर्यकुमार यादव याला सूर गवसला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सलग दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पहिल्या सामन्यात 50 आणि दुसऱ्या सामन्यात नाबाद 72 धावांची खेळी केली. दुसऱ्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव याचा 360 डिग्री अंदाज पाहायला मिळाला. टी20 फॉर्मेटमध्ये हिरो ठरलेला सूर्यकुमार यादव वनडेत का चालत नाही? असा प्रश्न पडला होता.पण यावेळी त्याने वनडे क्रिकेट फॉर्म्युला क्रॅक केल्याचं दिसून आलं. क्रीडाप्रेमींनी त्याची शैली पाहून हा अंदाज बांधला आहे.
वनडे क्रिकेट हे टी20 क्रिकेटपेक्षा वेगळं आहे. या फॉर्मेटमध्ये फलंदाजाला सेट होण्यास अधिकचा वेळ मिळतो. मग तो गोलंदाज असो की फलंदाज..सूर्यकुमार यादव याने हे गणित हेरलं आहे. त्यामुळे तो पहिले दहा चेंडू संयमी वृत्तीने खेळतो. याचा अंदाज दोन वनडे सामन्यावरून घेता येईल. मोहालीत सूर्यकुमार यादव याने 11 चेंडूत 7 धावा केल्या आणि इंदुरमध्ये 9 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. यावरून चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो की नाही? याचा अंदाज घेतो आणि नॅच्युरल गेम खेळण्यास सुरुवात करतो.
इंदुरमध्ये 9 चेंडूत 4 धावा केल्यानंतर सूर्याने पुढच्या चार चेंडूंवर सलग चार षटकार ठोकले. त्याने 14 चेंडूत 29 धावा केल्या होत्या. स्वीप हा सूर्यकुमार यादव याचा आवडीचा शॉट आहे. पण आशिया कप स्पर्धेत हा शॉट खेळताना बाद झाल होता. त्यावेळी त्याने 26 धावा केल्या होत्या. तो बाद झाल्यानंतर सामन्यावरील पकड सैल झाली आणि भारताने हा सामना 6 धावांनी गमावला.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही सामन्यात हा शॉट खेळणं सूर्यकुमार यादव याने टाळलं. इंदुरमध्ये अर्धशतकी खेळी केल्यानंतर हा शॉट आपल्या भात्यातून काढला. दोन दशकांपूर्वी असाच काहीसा निर्णय मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने घेतला होता. यात सचिन कवर ड्राईव्ह मारताना बाद होत होता. सिडनी कसोटीत सचिनने 241 धावांची खेळी केली. यात एकही कवर ड्राईव्ह मारला नाही.