मुंबई : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव परत एकदा फॉर्ममध्ये परतला आहे. वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला होता. मात्र तिसऱ्या सामन्यामध्ये तोडफोड स्टाईलने बॅटींग करत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे. त्यासोबतच सूर्याने आणखी एक खास पराक्रम आपल्या नावावर केलाय. टी-20 क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या सूर्याने टी-20 मध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेटने धावा केल्यात.
सूर्यकुमार यादव याने टी-20 मध्ये 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याच्यानंतर कॅमेरून ग्रीन दुसऱ्या स्थानी असून त्याने 139 च्या स्ट्राईक रेटने तर तिसऱ्या स्थानी हसन अली हा 129 च्या स्ट्राईक रेटसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्याच्या आसपासही कोणी नाही.
सूर्यकुमार यादव याने 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 51 सामन्यात 1780 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली आहेत. सूर्याची सर्वाधिक धावसंख्या 117 असून त्याला वन डे क्रिकेटमध्ये अद्याप आपली छाप पाडता आली नाही. सूर्याने वन डे मध्ये 511 धावा केल्या असून त्यामध्ये त्याने दोन अर्धशतके केली आहेत.
सूर्यकुमार यादव पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये फेल गेला होता. त्यामुळे त्याला तिसऱ्या टी-20 मध्ये फलंदाजी करणं गरजेचं होतं. भावानेही कॅरेबियन संघातील गोलंदाजांची पिसे काढत मजबूत धावा वसूल केल्या. सूर्याने या सामन्यामध्ये 44 चेंडूत 83 धावा केल्या, यामध्ये 10 चौकार आणि 4 षटकारांची आतषबाजी केली होती.
दरम्यान, पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेमधील पहिले दोन सामने वेस्ट इंडिज संघाने जिंकले होते. त्यामुळे तिसरा सामना टीम इंडियासाठी करो या मरो असा होता. परंतु नव्या दमाच्या पोरांनी हा सामना जिंकत 2-1 ने सुरूवात केली आहे. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.