मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी टीम इंडिया आता सज्ज झाली आहे. संघात कोणाला स्थान मिळणार आणि कोणाला डावलणार? हा प्रश्न आता संपला आहे. पण आता प्लेइंग इलेव्हनबाबत मोठी डोकेदुखी समोर आली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादव याची जागा नसल्याचं सांगितलं आहे. याबाबत त्यांनी आपलं मत मांडलं असून त्या मागचं कारणही सांगितलं आहे. सूर्यकुमार यादव टी20 क्रिकेटमधील बेस्ट खेळाडू आहे. चौकार आणि षटकारांसोबत मैदानात कुठेही चेंडू मारण्याची क्षमता आहे. त्यामुळेच वनडे क्रिकेटमध्ये त्याच्यावर एक डाव लावण्यात आला आहे. पण आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात साजेशी कामगिरी करू शकला नाही.
वनडे वर्ल्डकपच्या दृष्टीने सूर्यकुमार यादव याला वारंवार संधी देण्यात आली. मात्र साजेशी कामगिरी करण्यात अपयश आल आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत त्याने सलग दोन अर्धशतकं झळकावत निवड योग्य असल्याचं दाखवून दिलं. पण सुनील गावस्कर यांनी सूर्यकुमार यादव याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणं कठीण असल्याचं सांगितलं आहे. गावस्कर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत याबाबत मत मांडलं आहे.
‘सूर्यकुमार यादव यांनी वनडे क्रिकेटमध्ये काही खास केलेलं नाही. तो फक्त शेवटच्या 15-20 षटकात फलंदाजी करतो. टी 20 च्या क्षमतेचा वापर करतो आणि ते महत्त्वाचं आहे. पण हार्दिक पांड्या, इशान किशन आणि केएल राहुल हे देखील तसंच काहीसं करतात. त्यामुळे चार नंबरवर फलंदाजीसाठी श्रेयस अय्यरच योग्य ठरेल.’, असं सुनील गावस्कर यांनी सांगितलं.
“सूर्यकुमार यादव याला काही काळ वाट पाहावी लागेल. जर त्याला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली, तर त्याला शतक ठोकावं लागेल. त्याला दाखवून द्यावं लागेल की तो शतकी खेळी करू शकतो.”, असंही सुनील गावस्कर यांनी पुढे सांगितलं.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार यादव याने चांगली कामगिरी केली. सलग दोन अर्धशतकं झळकावत आत्मविश्वास दुणावला आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबरला होमार आहे. त्यामुळे या संघात सूर्यकुमार यादव याला संधी मिळणं कठीण आहे असंच दिसत आहे.