SZ vs NEZ | साऊथ झोनचा जबरदस्त विजय, नॉर्थ इस्ट झोनचा 9 विकेट्सने धुव्वा

| Updated on: Jul 28, 2023 | 4:20 PM

South Zone vs North East Zone Deodhar Trophy 2023 | साऊथ झोनने नॉर्थ इस्ट झोनवर 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला.

SZ vs NEZ | साऊथ झोनचा जबरदस्त विजय, नॉर्थ इस्ट झोनचा 9 विकेट्सने धुव्वा
Follow us on

पुद्देचरी | देवधर ट्रॉफी स्पर्धा 2023 मधील नवव्या सामन्यात साऊथ झोन क्रिकेट टीमने मयंक अग्रवाल याच्या नेतृत्वात विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली आहे. साऊथ झोनने नॉर्थ इस्ट झोनचा 9 विकेट्सने धुव्वा उडवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. साऊथ झोनने विजयासाठी मिळालेलं 137 धावांचं आव्हान हे अवघ्या 1 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. साऊथ झोनने 137 रन्सचं टार्गेट हे 19.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

साऊथ झोन टीमचा सलग तिसरा विजय

हे सुद्धा वाचा

साऊथ झोनच्या तिन्ही फलंदाजांनी विजयात उल्लेखनीय योगदान दिलं. रोहन कुन्नम्मल आणि कॅप्टन मयंक अग्रवाल या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. त्यानंतर मयंक 32 धावा करुन आऊट झाला. मयंकने या खेळीत 46 बॉलच्या मदतीने 3 फोर ठोकले.

त्यानंतर रोहन आणि एन जगदीशन या दोघांनी 42 धावांची नाबाद भागीदारी करत साऊथ झोनला विजयी केली. रोहनने 58 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 8 फोरच्या मदतीने नॉट आऊट 87 रन्स केल्या. तर जगदीशन 15 रन्सवर नाबाद राहिला. नॉर्थ इस्ट झोनकडून इमलीवती लेमतुर याने एकमेव विकेट घेतली.

नॉर्थ इस्टची बॅटिंग

नॉर्थ इस्ट झोनने टॉस जिंकून घेतलेला बॅटिंगचा निर्णय फसला. साऊथ झोनच्या बॉलिंगसमोर नॉर्थ इस्टचे फलंदाजीची घसरगुंडी झाली. नॉर्थ इस्ट झोनकडून चौघांनाच दुहेरी आकडा गाठण्यात यश आलं.

फेरोइजाम जोटिन याने सर्वाधिक 40 धावा केल्या. कॅप्टन लँगलोन्यम्बा केशांगबम याने 23, अभिषेक कुमार याने 15 आणि रेक्स सिंहने 14 धावा जोडल्या. या चोघांशिवाय उर्वरित 5 जणांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. एक तर भोपळा न फोडताच माघारी परतला. नबाम अबो 8 धावांवर नाबाद राहिला.

साऊथ झोनकडून एमर्जिंग आशिया कपमध्ये धमाका करणाऱ्या साई सुदर्शन याने 3 विकेट्स घेतल्या. तसेच विद्वत कवेरप्पा यानेही 3 फलंदाजांना माघारी पाठवलं. तर अर्जुन तेंडुलकर, विजयकुमार वैशाक, वॉशिंग्टन सुंदर आणि रोहित रायुडू या चौघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

साऊथ झोनची विजयी हॅटट्रिक

दरम्यान साऊथ झोनने या विजयासह हॅटट्रिक पूर्ण केली. साऊथने नॉर्थ झोनवर 24 जुलैला वीजेडी मेथडनुसार 185 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर 26 जुलैला वेस्ट झोनवर 12 रन्सने मात केली. तर आता नॉर्थ इस्ट झोनचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला.

साऊथ झोन प्लेईंग इलेव्हन | मयंक अग्रवाल (कॅप्टन), रोहन कुन्नम्मल, देवदत्त पडिक्कल, एन जगदीसन (विकेटकीपर), अरुण कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवासन साई किशोर, विजयकुमार वैशाक, विद्वत कवेरप्पा, रोहित रायडू आणि अर्जुन तेंडुलकर.

नॉर्थ इस्ट झोन प्लेईंग इलेव्हन | लँगलोन्यम्बा केशांगबम (कॅर्णधार), अनुप अहलावत, नीलेश लामिचने, पल्झोर तमांग, आशिष थापा (विकेटकीपर), अभिषेक कुमार, रेक्स राजकुमार, इमलीवाती लेमतूर, ली योंग लेपचा, फेरोइजाम जोटिन आणि नबाम अबो.