IND vs OMAN : आयुष बदोनीचं विस्फोटक अर्धशतक, टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक, सेमी फायनलमध्ये कुणाचं आव्हान?

| Updated on: Oct 23, 2024 | 11:10 PM

India a vs Oman A : इंडिया ए ने ओमानचा 6 विकेट्सने धुव्वा उडवत सलग तिसरा विजय मिळवला आहे. या सामन्याच्या निकालानंतर टीम इंडियाचा उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी कोण असणार? हे देखील निश्चित झालं आहे.

IND vs OMAN : आयुष बदोनीचं विस्फोटक अर्धशतक, टीम इंडियाची विजयी हॅटट्रिक, सेमी फायनलमध्ये कुणाचं आव्हान?
ayush badoni
Image Credit source: acc x account
Follow us on

तिलक वर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया ए च्या युवा ब्रिगेडने टी 20I एमर्जिंग आशिया कप 2024 स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक केली आहे. टीम इंडिया ए ने ओमान ए वर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. ओमानने टीम इंडियाला विजयासाठी 141 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 28 बॉलआधी 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाने 15.2 ओव्हरमध्ये 146 धावा केल्या. आयुष बदोनी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला. बदोनीने अर्धशतक खेळी केली. अभिषेक शर्मा याने 34 रन्सची झंझावाती खेळी केली. तर कॅप्टन तिलक वर्मा आणि रमनदीप सिंह या जोडीने टीम इंडियाला विजयापर्यंत नेलं.

टीम इंडियाची बॅटिंग

आयुष बदोनी याने 27 बॉलमध्ये 6 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 188.89 च्या स्ट्राईक रेटने 51 रन्स केल्या. त्याआधी अभिषेक शर्मा याने 15 चेंडूत 226.67 च्या विस्फोटक स्ट्राईक रेटने 5 चौकार आणि 1 षटकारच्या मदतीने 34 धावांचं योगदान दिलं. अनुज रावत याने 8 तर नेहल वढेरा याने 1 धाव केली. तर तिलक वर्मा आणि रमनदीप सिंह या जोडीने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. तिलक वर्माने 30 बॉलमध्ये 1 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 36 रन्स केल्या. तर रमनदीपने नॉट आऊट 13 रन्स केल्या. ओमानकडून करण सोनावले,सुफयान मेहमूद, आमिर कलीम आणि जय ओडेद्रा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पहिल्या डावात काय झालं?

त्याआधी ओमानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. ओमानने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 140 धावा केल्या. ओमानसाठी मोहम्मद नदीम याने सर्वाधिक 41 धावा केल्या. कॅप्टन जतिंदर सिंह याने 17, आमिर कलीम याने 13 आणि वसीम अली याने 24 धावांचं योगदान दिलं. तर हम्माद मिर्झा आणि संदीप गौड ही जोडी नाबाद परतली. हम्माद आणि संदीप या दोघांनी नाबाद 41 आणि 28 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून आकिब खान, रसीख सलाम, निशांत सिंधू, रमनदीप सिंह आणि साई किशोर या 5 जणांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

टीम इंडिया ए  विजयी

टीम इंडिया ए प्लेइंग ईलेव्हन : तिलक वर्मा (कर्णधार), अभिषेक शर्मा, अनुज रावत (विकेटकीपर), नेहल वढेरा, आयुष बदोनी, रमणदीप सिंग, निशांत सिंधू, राहुल चहर, रविश्रीनिवासन साई किशोर, रसिक दार सलाम आणि आकिब खान.

ओमान ए प्लेइंग ईलेव्हन : जतिंदर सिंग (कर्णधार), आमिर कलीम, करण सोनावले, वसीम अली, हम्माद मिर्झा (विकेटकीपर), मोहम्मद नदीम, सुफयान मेहमूद, समय श्रीवास्तव, जय ओडेद्रा, मुझाहिर रझा आणि संदीप गौड.