भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाचा सामना पार पडला. हा सामना भारताने 82 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीचा आशा जिवंत ठेवल्या आहेत. खरं तर न्यूझीलंडविरुद्ध 58 धावांनी पराभव झाल्यानंतर नेट रनरेटचा घडी विस्कटली होती. त्यामुळे हा रनरेट सुधारून उर्वरित तीन सामने जिंकण्याचं आव्हान होतं. पण भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कमबॅक केलं. भारताने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकी खेळीमुळे 172 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 90 धावांवर गडगडला. 19.5 षटकात संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यामुळे टीम इंडियाला 2 गुण मिळाले. तसेच -1.217 नेट रनरेटवरून हा +0576 इतका रनरेट केला आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडपेक्षा भारताचा आता नेट रनरेट चांगला आहे. श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर हीने मन मोकळं केलं आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं की, ‘आम्हाला फक्त विजयाची एक लय हवी होती. स्मृती आणि शफाली यांनी आम्हाला खूप चांगली सुरुवात करून दिली. त्यावर आम्ही चर्चा केली होती. आम्हाला आमची विकेट फेकायची नव्हती. आघाडीच्या फलंदाजांनी नेमके तेच केले आणि आम्हाला चांगली सुरुवात दिली. जेमी आणि मला एका षटकात फक्त 7-8 धावा काढायच्या होत्या आणि आम्ही तसंच करत गेलो. आजचा दिवशी मी माझ्या झोनमध्ये होतो, मी सकारात्मक विचार करत होतो आणि माझ्या झोनमध्ये असलेल्या कोणत्याही चेंडूवर प्रहार करत होतो. हे विकेट फलंदाजीसाठी फारसे चांगले नाही. तुम्हाला रोटेटिंग स्ट्राइक चालू ठेवावे लागेल आणि जेव्हा चेंडू झोनमध्ये असेल तेव्हाच तुम्ही तुमची बॅट स्विंग करू शकता. आज आम्ही स्वतःवर विश्वास ठेवला आणि स्ट्राइक फिरवत राहिलो आणि हेच आमच्यासाठी काम करत राहिलं.”
दुसरीकडे, श्रीलंकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टू हीने सांगितलं की, “आम्ही गोलंदाजीत संघर्ष केला, आम्ही काही सोपे झेल सोडले. फलंदाजांनी त्यांचे काम केले नाही, विशेषतः म टॉप-ऑर्डर लवकर बाद झाली आणि धावांचा पाठलाग करणे कठीण झाले. आम्हाला पाटी कोरी करून परत जावे लागेल आणि गोष्टींवर काम करावे लागेल. या प्रकारच्या स्पर्धेसाठी पहिला गेम खरोखरच महत्त्वाचा आहे. हा कमी धावसंख्येचा खेळ आहे आणि एक फलंदाज म्हणून आम्हाला त्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता.”