आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात डी ग्रुपमधील बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने असणार आहेत. या ग्रुपमधून दक्षिण आफ्रिकेने सुपर 8 साठी क्वालिफाय केलंय. त्यामुळे आता 1 जागेसाठी जोरदार चुरस असणार आहे. बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल. नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर स्कॉट एडवर्ड्स नेदरलँड्सचं कर्णधारपद सांभाळणार आहे दोन्ही संघांसाठी सुपर 8 च्या हिशोबाने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.
बांगलादेश आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांचा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील तिसरा सामना आहे. बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत करत विजयी सलामी दिली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलं होतं. बांगलादेशला सुपर 8 साठी आता नेदरलँड्स आणि नेपाळ विरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. तर दुसऱ्या बाजूला नेदरलँड्सने नेपाळला पराभूत करत विजयी सुरुवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं. आता नेदरलँड्सडे बांगलादेश आणि श्रीलंका असे 2 सामने बाकी आहेत. बांगलादेश आणि नेदरलँड्स दोन्ही संघांची या वर्ल्ड कप स्पर्धेत स्थिती सारखीच आहे. मात्र आता या सामन्यात कोण विजय मिळवणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे.
दरम्यान बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात आतापर्यंत 4 टी 20 सामने खेळवण्यात आले आहेत. बांगलादेशने यापैकी 3 तर नेदरलँड्सने 1 सामना जिंकला आहे. तर या 4 पैकी 2 सामने हे वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यात आले आहेत. बांगलादेशने या दोन्ही सामने जिंकलेत. त्यामुळे नेदरलँड्सची वर्ल्ड कपमध्ये बांगलादेश विरुद्ध विजयाची पाटी कोरीच आहे.
बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटॉन दास (विकेटकीपर), तन्झिद हसन, शाकीब अल हसन, तॉहिद हृदोय, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान, महेदी हसन, तन्वीर इस्लाम, शरीफुल इस्लाम आणि सौम्या सरकार.
नेदरलँड्स टीम : स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), मायकेल लेविट, मॅक्स ओडोड, विक्रमजीत सिंग, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, तेजा निदामनुरु, लोगन व्हॅन बीक, टिम प्रिंगल, पॉल व्हॅन मीकरेन, विवियन किंगमा, साकिब झुल्फिकार, आर्यन दत्त, काइल क्लेन आणि वेस्ली बॅरेसी.