वुमन्स टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशची विजयी सलामी, स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव

| Updated on: Oct 03, 2024 | 7:04 PM

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने स्कॉटलंडला पराभवाचं पाणी पाजलं आहे. बांगलादेशने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं. पण स्कॉटलंडला हे आव्हान गाठता आलं नाही.

वुमन्स टी20 वर्ल्डकपच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशची विजयी सलामी, स्कॉटलंडचा 16 धावांनी पराभव
Image Credit source: Twitter
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशने विजयी सलामी दिली आहे. ब गटात बांग्लादेश आणि स्कॉटलंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल बांगलादेशच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. स्कॉटलंडलाही प्रथम फलंदाजीच करायची होती. नाणेफेक गमावल्यानंतर कॅथरीन फ्रेझरने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं होतं. दरम्यान, बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. या खेळपट्टीवर किती धावा होऊ शकतात आणि पाठलाग करताना काय होऊ शकतं याचा अंदाज बांग्लादेश संघाला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 20 षटकात 7 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान ठेवलं. खरं तर 6 धावांच्या रनरेटने हे आव्हान सोपं असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. स्कॉटलंडचा डाव विजयी धावांचा पाठलाग करताना गडगडला. सारा ब्राइस वगळता एकही फलंदाज छाप सोडू शकला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांनी स्कॉटलंडला डोकंच वर काढू दिलं नाही. तसेच 103 धावांवर रोखलं आणि 16 धावांनी विजय मिळवला.

बांग्लादेशकडून शाथी राणी आणि शोभना मोश्तरी यांनी चांगल्या धावा केल्या. शाथीने 29, तर शोभना मोश्तरीने 36 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीत मरुफा अक्तर, नहिदा अक्तर, फहिमा खातुन, रबेय खान आणि रितू मोनी यांनी कमाल केली. त्यांनी स्कॉटलंडच्या फलंदाजांना फटकेबाजी करण्यापासून रोखलं. तसेच टप्प्याटप्प्याने विकेट घेत रनरेटही दाबला. त्यामुळे पहिल्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहण्याशिवाय स्कॉटलंडकडे गत्यंतर नव्हतं. बांगलादेशने पहिल्या सामन्यात विजय मिळवून गुणतालिके अव्वल स्थान पटकावलं आहे. आता आणखी तीन सामन्यात विजय मिळवला की उपांत्य फेरीचं तिकीट पक्कं होईल. पण हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

स्कॉटलंड वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): सास्किया हॉर्ले, सारा ब्राइस (विकेटकीपर), कॅथरीन ब्राइस (कर्णधार), आयल्सा लिस्टर, प्रियानाझ चॅटर्जी, डार्सी कार्टर, लोर्ना जॅक, कॅथरीन फ्रेझर, रेचेल स्लेटर, अबताहा मकसूद, ऑलिव्हिया बेल.

बांगलादेश वुमन्स (प्लेइंग इलेव्हन): मुर्शिदा खातून, शाठी राणी, शोभना मोस्तारी, निगार सुल्ताना (विकेटकीपर/कर्णधार), ताज नेहर, शोर्ना अक्टर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, नाहिदा अक्टर, मारुफा अख्तर.