मुंबई : रोहित शर्मा 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर या फॉर्मेटपासून दूर होता. रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केलं. पण दुर्दैवाने अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यानंतर आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्यासाठी बीसीसीआयने पुन्हा एकदा कंबर कसली. त्यासाठी मोर्चेबांधणी आतापासून सुरु केली. टी20 वर्ल्डकपसाठी तीन महिन्यांचा अवधी शिल्लक आहे. याचं भान बीसीसीआय अधिकारी आणि निवड समितीला आहे. त्या दृष्टीने अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेतून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी पुनरागमन झालं. तसेच रोहित शर्माने कर्णधारपदाची धुराही सांभाळली. रोहित शर्माच्या गैरहजेरीत हार्दिक पांड्याकडे नेतृत्व सोपण्यात आलं होतं. पण सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. रोहित शर्माकडेच नेतृत्व का सोपवलं याचं कारणंही बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं. “रोहित शर्माकडे सर्व फॉर्मेटचं कर्णधारपद आहे. हा सर्वानुमते घेतलेला निर्णय आहे. तर हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपद असेल.”, असं बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितलं.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद का सोपवलं नाही? असा प्रश्नही समोर आला होता. त्यावर प्रश्नावरही बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सडेतोड मत मांडलं. “एक लक्षात ठेवा वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या मध्यात हार्दिक पांड्याला दुखापत झाली. त्यानंतर तो खेळला नाही. अशी स्थिती पुन्हा उद्भवली तर कोणावर जबाबदारी सोपावयची हा देखील प्रश्न होता.”, असं जय शाह यांनी पुढे सांगितलं.
“अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्माने चांगली कामगिरी केली आहे. 4 बाद 27 अशी स्थिती होती. पण रोहित शर्माच्या शतकी खेळीने चित्रच पालटलं. त्यामुळे त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच जाऊ शकत नाही. वनडे वर्ल्डकपमध्येही आम्ही सलग दहा सामने जिंकलो. पण अंतिम फेरीत पराभूत झालो. हा एक खेळाचा भाग आहे.”, असंही जय शाह पुढे म्हणाले. “मी खात्री घेऊन सांगतो भारत 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप जिंकेल.”, असा आत्मविश्वासही जय शाह यांनी व्यक्त केला.
दुसरीकडे, हार्दिक पांड्या देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्यानेही बीसीसीआय नाराज असल्याची चर्चा आहे. वर्ल्डकपनंतर हार्दिक पांड्या हा दुखापतीतून सावरला असल्याचे सोशल मीडियावरील व्हिडीओतून दिसत आहे. पांड्यासह इतर काही खेळाडू देशांतर्गत क्रिकेटऐवजी खेळाडू आयपीएलला प्राधान्य देत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत क्रिकेटचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बीसीसीआयने कठोर पावलं उचलली आहे.