टी20 वर्ल्डकप स्पर्धेत एकूण 20 संघ साखळी फेरीत खेळत आहेत. त्यापैकी 12 संघांचा या फेरीतच प्रवास संपणार आहे. तर उर्वरित 8 संघ पुढच्या प्रवासासाठी जोरदार लढत देतील. सुपर 8 फेरीसाठी आतापर्यंत चार संघांची नावं निश्चित झाली आहेत. तर उर्वरित चार संघांसाठी त्या त्या गटात चुरस पाहायला मिळत आहे. अ गटातून भारताने तीन सामने जिंकत सुपर 8 फेरीतील तिकीट पक्क केलं आहे. तर दुसऱ्या संघासाठी अमेरिका,पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा या संघात चुरस आहे. खरं तर अमेरिकेला सर्वाधिक संधी आहे. कारण अमेरिकेचे 4 गुण असून शेवटचा सामना आयर्लंडविरुद्ध आहे. हा सामना जिंकला तर थेट तिकीट पक्कं होईल. तर अमेरिकेचा पुढचा सामना आयर्लंडशी आहे. हा सामना अमेरिकेने जिंकला तर पाकिस्तान आव्हान संपुष्टात येईल. दुसरीकडे, कॅनडाचा शेवटचा सामना भारताशी आहे. त्यामुळे कॅनडला सामन्यात विजय मिळवणं वाटत तितकं सोपं नाही. तर आयर्लंडने दोन्ही सामने जिंकले आणि नेट रनरेट चांगला ठेवला तर संधी मिळू शकते.
ब गटातून ऑस्ट्रेलियाने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. तर नामिबिया आणि ओमानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे आता स्कॉटलँड आणि इंग्लंडमध्ये सुपर 8 फेरीसाठी चुरस आहे. स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. स्कॉटलँडने हा सामना जिंकला तर थेट सुपर 8 फेरीचं तिकीट मिळेल.पण सामना गमावला तर इंग्लंडला संधी मिळेल. इंग्लंडला उर्वरित दोन सामने नामिबिया आणि ओमानविरुद्ध खेळायचे आहेत. त्यामुळे इंग्लंडने हे दोन्ही सामने जिंकले तर नेट रनरेटच्या आधारावर स्कॉटलँड किंवा इंग्लंडला तिकीट मिळू शकतं.
क गटातून वेस्ट इंडिजने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. तर दुसऱ्या जागेसाठी अफगाणिस्तान, न्यूझीलंड, युगांडा, पापुआ न्यू गिनी यांच्यात चुरस आहे. या संघांचं सर्वकाही एकमेकांवर अवलंबून आहे. अफगाणिस्तानला या गटातून सर्वाधिक संधी आहे. अफगाणिस्तानने दोन पैकी एक सामना जिंकला की तिकीट पक्कं होईल. न्यूझीलंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. पण तसं झालं नाही तर न्यूझीलंडला उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवून संधी आहे.
ड गटात सर्वाधिक गडबड दिसत आहे. या गटातून दक्षिण अफ्रिकेने सुपर 8 फेरीत जागा मिळवली आहे. पण दुसऱ्या संघासाठी शेवटच्या टप्प्यात जबरदस्त चुरस आहे. बांगलादेश, नेदरलँड यांना सर्वाधिक संधी आहे. तर नेपाळ आणि श्रीलंकेला त्या तुलनेत संधी कमीच आहे. त्यामुळे त्यांचं आव्हान स्पर्धेतून जवळपास संपुष्टात आलं आहे, असं बोलणं वावगं ठरणार नाही.