IND vs AUS : इंझमाम उल हकने भारतीय संघावर केले गंभीर आरोप, 15 व्या षटकात जे काही झालं ते…

| Updated on: Jun 25, 2024 | 7:20 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. मात्र पाकिस्तानचं रडगाणं काही संपता संपत नाही. आता माजी क्रिकेट इंझमाम उल हकने भारतीय संघावर गंभीर आरोप केला आहे. यात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात चिटिंग केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नेमकं असं काय घडलं की..

IND vs AUS : इंझमाम उल हकने भारतीय संघावर केले गंभीर आरोप, 15 व्या षटकात जे काही झालं ते...
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानवर पहिल्याच फेरीत बाद होण्याची नामुष्की ओढावली. अमेरिकेने पराभूत केल्यानंतर पुढचं सर्वच चित्र बिघडलं. त्यानंतर भारताने धोबीपछाड दिला आणि पुढच्या सर्वच आशा मावळल्या. दुसरीकडे, भारताची विजयी घोडदौड सुरु आहे. भारताच्या कामगिरीमुळे पाकिस्तानची पोटदुखी वाढली आहे. कारण रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यात अफगाणिस्तानही उपांत्य फेरीत गेल्याने पाकिस्तानला पोटशूल झाला आहे. अशा सर्व स्थितीत पाकिस्तानच्या आजी माजी क्रिकेटपटूंनी भारतावर नको ते आरोप करण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानच्या एका टीव्ही चॅनेलवर चर्चेला बसले असताना इंझमाम उल हकने गंभीर आरोप केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात भारताने चेंडूसोबत छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या चर्चेत बसलेले दुसरे पाहुणे सलीम मलिक यानेही या आरोपात तथ्य असल्याचं म्हंटलं आहे. त्यामुळे या माजी क्रिकेटपटूंना किती पोटदुखी झाली आहे हे कळत आहे.

इंजमाम उल हक आणि सलीम मलिक याने पाकिस्तानच्या स्पोर्ट्स 24 न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात टीम इंडियावर फसवणुकीचा आरोप केला आहे. इंझमामने वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला मिळालेल्या रिव्हर्स स्विंगसाठी आक्षेप घेतला आहे. 15 व्या षटकात अर्शदीपने टाकलेला चेंडू रिव्हर्स स्विंग झाला होता. यावरून इंझमामने सांगितलं की, 12 व्या किंवा 13 व्या षटकात चेंडू रिव्हर्स स्विंगसाठी तयार झाला होता. इंझमामने पुढे सांगितलं की, पंचांनी चेंडू तपासायला हवा, टीम इंडियाने चेंडूसोबत काही केलं की नाही?

इंझमाम उल हकच्या या आरोपानंतर सलिम मलिक यानेही त्याची री ओढली. सलिम मलिकने सांगितलं की, “चेंडू तपासण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी आहेत. भारत आणि आणखी काही संघांना यातून सूट आहे.” त्यानंतर पुन्हा एकदा इंझमामने सांगितलं की, आमच्या संघाच्या खेळाडूंसोबत असं झालं असतं तर त्याचा मुद्दा झाला असता.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारत, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान हे संघ पोहोचले आहेत. भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. तर दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे. आता जेतेपदावर या चार संघापैकी कोणता संघ नाव कोरणार याची उत्सुकता वाढली आहे.