टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने एन्ट्री मारल्यानंतर अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या 11 वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची एक संधी आहे. भारतीय संघ जेतेपदापासून फक्त दोन विजय दूर आहे. मात्र ही परीक्षा वाटते तितकी सोपी नसून जेतेपदासाठी संघर्ष करावा लागणार आहे. भारताने एकही सामना न गमवता इथपर्यंत मजल मारली आहे. इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिलं. भारताने ऑस्ट्रेलियावर 24 धावांनी विजय मिळवला. असं असताना माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कर्णधार रोहित शर्मा याच्या कर्णधारपदाचं आणि फलंदाजीचं कौतुक केलं आहे. स्वत:साठी खेळलेल्या अनेक महान खेळाडूंपेक्षा वेगळा आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. रोहितच्या निस्वार्थीपणाबद्दल आणि सहकारी संघातील सदस्यांसाठी प्रेरणा म्हणून त्याचे कौतुक केले. इतकंच काय तर विराट कोहलीला टोमणा मारत रोहितची स्तुती केली.
“रोहित शर्मा विराटसारखा नाही. तो काय उड्या मारत नाही. त्याला त्याच्या मर्यादा माहिती आहेत. त्या मर्यादांमध्ये त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू कोणी नाही. “, एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कपिल देव यांनी हे मत मांडलं. त्यांच्या वक्तव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “अनेक मोठे खेळाडू येतात, ते त्यांच्या स्वत:च्या करिअरची काळजी घेतात, अगदी त्या दृष्टिकोनातून कर्णधारही तसंच करतात. त्यामुळेच रोहितकडे अतिरिक्त गुण आहे, कारण तो संपूर्ण संघाला आनंदी ठेवतो,” असंही कपिल देव पुढे म्हणाला. दरम्यान या स्पर्धेत विराट कोहलीच्या बॅटमधून हव्या तशा धावा आलेल्या नाहीत.
Kapil Dev said 🗣️
Rohit Sharma doesn't jump like Virat Kohli to show aggression he expresses it in his batting.
Rohit ain't like other captains who only care for their career. pic.twitter.com/ZYjEbgblEq
— Nisha (@NishaRo45_) June 26, 2024
गतविजेता इंग्लंड संघ आणि भारत यांच्यात भारतीय वेळेनुसार 27 जूनला रात्री 8 वाजता सामना सुरु होईल. पण या सामन्यावर पावसाचं गडद सावट आहे. हा सामना ठरलेल्या अतिरिक्त वेळेत झाला नाही तर रद्द करण्याची वेळ येईल. या सामन्यासाठी राखीव दिवस नाही. जर सामना रद्द करण्याची वेळ आली तर भारताला फायदा होईल. कारण सुपर 8 फेरीतील चमकदार कामगिरीसाठी भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. तर इंग्लंडला सामना न खेळताच स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागेल.