टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25वा सामना भारत आणि अमेरिका यांच्यात रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. एकदम किचकट अशा पिचवर भारतीय गोलंदाजी भेदत अमेरिकेने 20 षटकात 8 गडी गमवून 110 धावा केल्या आणि विजयासाठी 111 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना भारताची चांगलीच दमछाक झाली. भारताने अमेरिकेने दिलेलं आव्हान 18.2 षटकात 3 गडी गमवून पूर्ण केलं. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे हा विजय सोपा झाला. पण एकवेळ अशी होती की या दोघांना धावा करणं कठीण झालं होतं. चेंडू कमी आणि धावा जास्त अशी स्थिती होती. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांचं टेन्शन वाढलं होतं. अशाच अचानक पंचांनी एक वेगळाच इशारा केला. यामुळे प्रेक्षकांना त्या इशाऱ्याचा नेमका अर्थ काही कळला नाही. मैदानात नेमकं असं काय घडलं की पंचांनी असा इशारा केला. आयसीसीच्या नव्या नियमानुसार पंचांनी हा इशारा केला आणि भारताला फुकटच्या 5 धावा मिळाल्या.
अमेरिकेच्या कर्णधाराने 16वं षटक जसदीप सिंगच्या हाती सोपवलं होतं. तेव्हा भारताला 30 चेंडूत 35 धावा हव्या होत्या. या खेळपट्टीवर तसं पाहिलं तर हे आव्हान खूपच कठीण होतं. एकीकडे चेंडू कसा येईल याचा अंदाज नसताना मैदानात भलतंच घडलं. या षटकाचा पहिलाच चेंडू टाकण्यापूर्वी पंचांनी इशारा देत पाच धावा दिल्या. अमेरिकेच्या कर्णधारालाही पहिल्यांदा काही कळलं नाही. अखेर समालोचकांनी या मागचं गणित सांगितलं. नव्या नियमानुसार अमेरिकेला हा फटका बसल्याचं सांगितलं. अमेरिकेने तीन वेळा षटकं टाकताना उशीर केला. दोन वेळा पंचांनी वॉर्निंग दिली होती. मात्र तिसऱ्यांदा भारताच्या खात्यात थेट पाच धावा जमा झाल्या. आयसीसीच्या नव्या नियमाचा अमेरिका पहिला बळी ठरला आहे.
भारताकडून सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी चांगली खेळी केली. या दोघांनी मिळून 72 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने 49 चेंडूत नाबाद 50 धावा केल्या. यात दोन चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. तर शिवम दुबने 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने नाबाद 31 धावा केल्या. भारताकडून अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली. अर्शदीप सिंगने 4 षटकात 9 धावा देत 4 गडी बाद केले.