IND vs ENG : भारत इंग्लंड सामन्यात या खेळाडूंच्या खांद्यावर असेल विजयाची जबाबदारी, जाणून घ्या कोण ते

| Updated on: Jun 26, 2024 | 5:27 PM

टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदापासून टीम इंडिया दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना इंग्लंडशी आहे. मागच्या पर्वात इंग्लंडने भारताला पराभूत केलं होतं आणि जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यामुळे या सामन्यावर सर्व काही अवलंबून असणार आहे. या सामन्यात काही खेळाडू महत्त्वाची भूमिका बजावतील. चला जाणून घेऊयात त्यांच्याबाबत

IND vs ENG : भारत इंग्लंड सामन्यात या खेळाडूंच्या खांद्यावर असेल विजयाची जबाबदारी, जाणून घ्या कोण ते
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने येणार आहे. 27 जूनला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना होणार आहे. गयाना आंतरराष्ट्रीय मैदानात हा सामना रंगणार आहे. या सामन्यातून टीम इंडियाला मागच्या वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. त्यामुळे ही लढत बऱ्याच अंशी रंजक असणार आहे. दुसरीकडे, इंग्लंडला कमी लेखून चालणार नाही. इंग्लंडने साखळी फेरीत जर तरच गणित सोडवून सुपर 8 फेरीत धडक मारली. त्यानंतर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड या सामन्यात कोण बाजी मारेल हे सांगणं आता तरी कठीण आहे. मात्र क्रीडाप्रेमींना एका चांगल्या सामन्याची मेजवानी मिळेल यात शंका नाही. गयानामधील खेळपट्टीचं सांगायचं तर, ही खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी आहे. या खेळपट्टीचा भारतीय फिरकीपटूंना फायदा होईल. कारण भारतीय संघात टॉप क्लास फिरकीपटू आहेत.

या सामन्यात काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करू शकतात. मागचा खेळ पाहता असाच अंदाज आहे. इंग्लंडकडून 4 आणि भारताचे 7 खेळाडू चमकदार कामगिरी करू शकतात. इंग्लंडकडून जोस बटलर, फिलिप सॉल्ट, हॅरी ब्रूक आणि जोफ्रा आर्चर ही नावं आघाडीवर आहेत. तर भारताकडून ऋषभ पंत, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांचं नाव आघाडीवर आहे. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने भारताला पराभवाची धूळ चारली होती. भारताने विजयासाठी दिलेलं आव्हान 10 गडी राखून पूर्ण केलं होतं.  त्यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यात द्वंद्व पाहायला मिळेल यात शंका नाही.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), फिल सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, विल जॅक्स, लियाम लिविंगस्टोन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, मार्क वूड, आदिल राशीद

भारत : विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.