टीम इंडियाने रविवारी 9 जून रोजी लो स्कोअरिंग सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 120 धावांचा आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 119 धावांचा शानदार बचाव करत पाकिस्तानला 6 धावांनी धुळ चारली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय तर पाकिस्तानचा सलग दुसरा पराभव ठरला. टीम इंडियाने या विजयासह सुपर 8 साठी दावेदारी आणखी मजबूत केली आहे. त्यानंतर आता 10 जून रोजी दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात सामना पार पडणार आहे. या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे.
नेपाळ क्रिकेटच्या गोटातून वर्ल्ड कप दरम्यान मोठी अपडेट आली आहे. नेपाळचा 23 वर्षीय गोलंदाज संदीप लामिछाने याचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संदीप नेपाळ टीमसोबत जोडला जाणार आहे. संदीप नेपाळसाठी अखेरचे 2 सामने खेळणार आहे. नेपाळ क्रिकेट टीमने सोशल मीडियावरुन प्रसिद्धपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित पौडेलसह नेपाळ क्रिकेट टीममध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र अद्याप याबाबत आयसीसीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. नियमांनुसार ठराविक मुदतीनंतर वर्ल्ड कप संघात बदल करण्यासाठी आयसीसीच्या तांत्रिक समितीची परवानगी आवश्यक असते.
संदीप लामिछाने याला काही दिवसांपूर्वी एका प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आलं. त्यानंतर संदीपला अमेरिकेने व्हीजा नाकारला होता. नेपाळचे पहिले 2 सामने अमेरिकेत आयोजित करण्यात आले आहेत. मात्र आता नेपाळचे उर्वरित सामने हे वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहेत. त्यामुळे संदीपला उर्वरित 2 सामने खेळण्यासाठी व्हीजाची गरज नसेल. त्यामुळे आता नेपाळ क्रिकेट टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान नेपाळ क्रिकेट टीम डी ग्रुपमध्ये आहेत. नेपाळसह या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, नेदरलँड्स आणि श्रीलंका एकूण 5 संघांचा समावेश आहे. नेपाळला पहिल्या सामन्यात नेदरलँड्सकडून 6 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता नेपाळचा दुसरा सामना हा 11 जून रोजी श्रीलंका विरुद्ध होणार आहे. तर उर्वरित 2 सामने हे 14 आणि 16 जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश विरुद्ध होणार आहेत.
नेपाळ क्रिकेट बोर्डाकडून मोठी माहिती
जारी आईसीसी पुरुष टि२० विश्वकप २०२४ का लागि नेपाली खेलाडी सन्दिप लामिछाने वेस्ट इण्डिजमा हुने खेलहरुमा नेपाली राष्ट्रिय क्रिकेट टोलीमा समावेश हुने जानकारी गराउन चाहन्छौं।
प्रेस बिज्ञप्ति pic.twitter.com/i10ZcUyfVz
— CAN (@CricketNep) June 10, 2024
नेपाळ क्रिकेट टीम: रोहित पौडेल (कॅप्टन), कुशल भुरटेल, आसिफ शेख (विकेटकीपर), अनिल साह, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, गुलसन झा, सोमपाल कामी, करण केसी, अविनाश बोहरा, सागर ढकल आणि संदीप लामिछाने.
राखीव खेळाडू: संदीप जोरा, प्रतिस जीसी, कमल सिंग आयरी, ललित राजबंशी