टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मोठा उलटफेर, दुबळ्या नेदरलँडने वर्ल्ड चॅम्पियन टीमला पाजलं पराभवाचं पाणी

| Updated on: May 29, 2024 | 2:32 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागी असलेले 20 संघ सराव सामन्यातून आत्मपरीक्षण करत आहेत. पण या सराव सामन्यात दुबळ्या नेदरलँड संघाने कमाल केली. वर्ल्डकप विजेत्या संघाला पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेत उलटफेर पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी मोठा उलटफेर, दुबळ्या नेदरलँडने वर्ल्ड चॅम्पियन टीमला पाजलं पराभवाचं पाणी
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं नववं पर्व 1 जूनपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 20 संघ सहभागी झाले आहेत. एकूण चार गट असून प्रत्येक गटात पाच संघ आहेत. प्रत्येक गटातील दोन संघ सुपर 8 फेरीत स्थान मिळवतील. असं असताना स्पर्धेपूर्वी 20 संघ जोरदार सराव करत आहेत. असाच एक सामना नेदरलँड आणि श्रीलंका यांच्यात पार पडला. या सामन्यापूर्वी श्रीलंकेचं पारडं जड मानलं जात होतं. मात्र भलतंच घडलं. दुबळ्या नेदरलँडने श्रीलंकेला पराभवाचं पाणी पाजलं. या पराभवाचा प्रभाव ग्रुप स्टेजमध्ये पाहायला मिळू शकतो. त्यामुळे स्पर्धेपूर्वी पुढच्या लढती रंगतदार होती यात शंका नाही. सराव सामन्यात नाणेफेकीचा कौल श्रीलंकेच्या बाजून लागला आणि त्यांनी पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय श्रीलंकेच्या अंगलट आला. नेदरलँडच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेने नांगी टाकली.

नेदरलँडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. 182 धावांचं आव्हान श्रीलंका सहज गाठेल असं वाटत होतं. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. श्रीलंकन फलंदाजांचा नेदरलँडपुढे निभाव लागला नाही.श्रीलंकन संघाने 18.5 षटकं खेळली आणि संपूर्ण संघ 161 धावांवर तंबूत परतला. नेदरलँडने श्रीलंकेचा 20 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे श्रीलंकेच्या जेतेपदाच्या स्वप्नाला स्पर्धेपूर्वीच ग्रहण लागलं आहे.

नेदरलँड संघाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत कायम मोठ्या संघांची अडवणूक केली आहे. 2009 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडने इंग्लंडला 4 विकेटने पराभूत केलं होतं. 2014 मध्ये नेदरलँडने इंग्लंडचा 45 धावांनी पराभव केला होता. मागच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी धुव्वा उडवला होता. त्यामुळे नेदरलँडचा संघ मोठा उलटफेर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नेदरलँडचा संघ ड गटात असून या गटात दक्षिण अफ्रिका, श्रीलंका, नेपाळ आणि बांगलादेश हे संघ आहेत.

टी20 वर्ल्डकपसाठी दोन्ही संघाचे खेळाडू

श्रीलंका : वानिंदु हसरंगा (कर्णधार), चॅरिथ असलांका (उपकर्णधार), कुसल मेंडिस, पथुम निसांका, कामिंदु मेंडिस, सदीरा समरविक्रमा, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, धनंजय डी सिल्वा, महेश थीक्षाना, डुनिथ वेलालेज, दुष्मंथा चमीरा, नुवान तुषारा, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका.

नीदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, डेनियल डोरम, फ्रेड क्लासेन, काइल क्लेन, लोगन वान बीक, मॅक्स ओ’डोव्ड, माइकल लेविट, पॉल वॅन मीकेरेन, साइब्राँड अँगेलब्रेक्ट, तेजा निदामानुरु, ⁠⁠टिम प्रिंगल, विक्रम सिंह, विव किंग्मा, वेस्ले बर्रेसी.