वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा अर्धवट सोडून जाण्याची पाकिस्तान कर्णधारावर वेळ, झालं असं की..

| Updated on: Oct 10, 2024 | 5:23 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आता रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहेत. एका जय परायजने उपांत्य फेरीचं गणित विस्कटणार आहे. असं असताना पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना मायदेशी परतली आहे. त्यामुळे आता मुनीबा अली पुढील सामन्यात पाकिस्तानची कमान सांभाळणार आहे.

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा अर्धवट सोडून जाण्याची पाकिस्तान कर्णधारावर वेळ, झालं असं की..
Image Credit source: ICC
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचा महत्त्वाचा टप्पा सुरु आहे. उपांत्य फेरीसाठी आता चुरशीची लढाई आहे. अ गटातून ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात चढाओढ आहे. त्यामुळे कधी काय होईल सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीच्या दिशेने आपला दावा जवळपास पक्का केला आहे. दोन पैकी एक सामना जिंकलं तरी उपांत्य फेरी गाठणार आहे. पण भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसाठी करो या मरोची लढाई आहे. असं असताना शुक्रवारी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महत्त्वपूर्ण लढत होणार आहे. हा सामना पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यावर स्पर्धेतील आव्हान ठरणार आहे. पण यापूर्वी पाकिस्तान संघाला एक धक्का बसला आहे. कारण या सामन्यापूर्वी पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना मायदेशी परतली आहे. सना घरी दु:खद घटना घडल्याने तिला स्पर्धा अर्धवट सोडून मायदेशी परतावं लागलं आहे.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानकडून कर्णधारपद भूषविणारी सर्वात तरुण खेळाडू म्हणून फातिमा सनाला मान मिळाला आहे. निदा दारच्या जागी तिच्याकडे कर्णधरपदाची धुरा सोपण्यात आली होती. फातिमा सनाने वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी फक्त एका मालिकेत संघाचं कर्णधारपद भूषविलं होतं. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सनाने जबरदस्त फलंदाजी केली होती. मालिकेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली होती.

फातिमा सनाच्या नेतृत्वात पाकिस्तानने आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात श्रीलंकेला 31 धावांनी पराभूत केलं. तर भारताविरूद्धच्या सामन्यात फातिमा सनाच्या कर्णधारपदाचं कौतुक झालं. कारण भारताला विजय मिळवण्यापेक्षा झटपट धावा करून सामना संपवायचा होता. यासाठी नेट रनरेट हे मोठं कारण होतं. पण फातिमा सनाने गोलंदाजीतही कमाल केली होती आणइ 23 धावा देत 2 गडी बाद केले होते. दरम्यान, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार सामना खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर उपांत्य फेरीतील स्थान पक्कं होईल. दुसरीकडे, पाकिस्तान पराभूत झाला तर या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.