अमेरिकेत क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन केलं आहे. त्यामुळे प्रचंड उत्सुकता वाढली आहे. यजमान अमेरिकाचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार 2 जून रोजी सकाळी 6 वाजता कॅनडाशी होणार आहे. अमेरिकेत विश्वचषकासाठी तीन ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी सर्वाधिक सामने फ्लोरिडामध्ये खेळवले गेले आहेत. तर मेजर लीग क्रिकेटचे सामने टेक्सासमधील डलास स्टेडियममध्येही खेळले गेले असल्याने या खेळपट्टीचा अंदाज आहे. पण न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदाच क्रिकेट खेळले जाणार आहे. यासाठी नासाऊ काउंटीमधील आयझेनहॉवर पार्कमध्ये स्टेडियम तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या मैदानातील या खेळपट्ट्यांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. न्यूयॉ़र्कमध्ये बांधलेल्या मैदानात ड्रॉप इन पिचेस आहेत. म्हणजेच खेळपट्ट्या या बाहेरून आणून बसवल्या गेल्या आहेत. त्यामुळे ही खेळपट्टी सामन्यादरम्यान कशी वागेल याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गोलंदाजांना मदत करणार की फलंदाजांना याबाबत आतापासून खलबतं सुरु झाली आहेत.
भारतीय संघाला या मैदानावर सराव सामन्याव्यतिरिक्त साखळी फेरीतील तीन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे सुपर 8 फेरीत जाण्यासाठी या खेळपट्टीचा अंदाज माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी या खेळपट्टीचा अभ्यास केला. गुरुवारी आयसीसीकडून नैसो स्टेडियममध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हीच संधी कर्णधार रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांनी साधली. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, दोघांनी या खेळपट्टीची पाहणी केली. पहिल्या देखरेखीत खेळपट्टी चांगली असल्याचं दिसून आलं आहे. दोघांना ही खेळपट्टी चंगली वाटली आणि फलंदाजीसाठी पूरक असल्याचं दिसून आलं.
आयसीसीने कर्णधार रोहित शर्मा याचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. यात रोहित शर्मा या मैदानाची स्तुती करताना दिसत आहे. आता सराव सामन्यापासून भारतीय संघ या स्पर्धेचा नारळ फोडणार आहे. सराव सामन्यात भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सलग दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर खऱ्या अर्थाने आता कस लागणार आहे. या मैदानात 5 जूनला आयर्लंड, 9 जूनला पाकिस्तान आणि 12 जूनला अमेरिकेशी सामना होणार आहे. टीम इंडियासह या मैदानावर श्रीलंका आणि दक्षिण अफ्रिका हे संघ भिडणार आहे आहेत. या मैदानावर साखळी फेरीतील 8 सामने होणार आहेत.