पाकिस्तान संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदी इमोशनल, चाहत्यांना सांगितलं की…

| Updated on: Jun 15, 2024 | 9:46 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची सर्वात खराब कामगिरी राहिली. पहिल्याच फेरीत पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सर्वच बाजूने आता पाकिस्तान संघावर टीकेचा भडीमार होत आहे. असं असताना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचं दु:ख समोर आलं आहे.

पाकिस्तान संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदी इमोशनल, चाहत्यांना सांगितलं की...
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी पाकिस्तान संघ जेतेपदासाठी एक प्रबळ दावेदार मानला जात होता. अनेकांनी पाकिस्तानला पसंती देखील दिली होती. मात्र साखळी फेरीतच पाकिस्तानला गाशा गुंडाळावा लागला. यामुळे पाकिस्तानी मीडिया, फॅन्स आणि माजी क्रिकेटपटूंच्या रडारवर खेळाडू आले आहेत. टीकेचा भडीमार होत असताना वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी इमोशनल झाला आहे. त्याने आपल्या वेदना व्यक्त करताना आपली बाजू मांडली आहे. शाहीन आफ्रिदीने सांगितलं की, “चांगली वेळ असते तेव्हा सोबत असता, असंच फॅन्सनी वाईट काळातही टीमसोबत उभं राहणं गरजेचं आहे. पाकिस्तानी कोणत्या गल्लीतली क्रिकेट टीम नाही. ही टीम तुमची पण आहे.”

शाहीन आफ्रिदीने भले इमोशनल होऊन वक्तव्य केलं असेल. पण खराब कामगिरी केल्यानंतर प्रश्नचिन्ह तर उपस्थित केलं जाणार हे मात्र तितकंच खरं आहे. अमेरिकेसारख्या दुबळ्या संघाकडून पराभूत झाल्यानंतर टीकेचा भडीमार तर होणारच. दुसरीकडे, पाकिस्तानी संघात तीन गट असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचं मोठं नुकसान झालं आहे. आता पाकिस्तानला आयर्लंडविरुद्ध शेवटचा सामना खेळायचा आहे. हा सामना रविवारी लॉडरहिलमध्ये होणार आहे. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत पाकिस्तानला फटका बसला होता. मालिका जिंकली होती, पण पहिल्या सामन्यात आयर्लंडने पराभूत केल्याने नाचक्की झाली होती. आता वर्ल्डकपमध्ये असं काही होऊ नये यासाठी पाकिस्तान सज्ज असणार आहे.

पाकिस्तान आयर्लंड सामन्यावरही पावसाचं सावट आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, स्पर्धेनंतर पाकिस्तानी संघावर मोठी कारवाई होऊ शकते. या संघातून काही खेळाडूंना घरी बसवलं जाऊ शकतं. इतकंच काय तर मानधन देखील कमी करण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बाबर आणि रिझवानसारख्या खेळाडूंना विदेशी लीग खेळणंही कठीण होऊ शकतं. पण असं सर्व असताना कर्णधारपदाची माळ कोणच्या गळ्यात पडणार हे मात्र स्पष्ट नाही. चॅम्पियन लीगपर्यंत बाबर आझमकडेच धुरा असण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सैम अयुब, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.