आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधीलल 45 व्या सामन्यात सुपर 8 फेरीत ग्रुप 2 मधील इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियम, सेंट लूसिया येथे या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करतोय. तर एडन मारक्रम याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची सुत्र आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 8 मधील दुसरा सामना आहे. या सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कॅप्टन जॉसने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.
इंग्लंडने या सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन जॉस बटलरने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय केलाय. मात्र दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. कॅप्टन एडन मारक्रम याने ओटनील बार्टमॅन याला बाहेर ठेवलंय. तर त्याच्या जागी तरबेझ शम्सी याचा समावेश केला आहे.
दरम्यान दक्षिण आफ्रिका या स्पर्धेत अजिंक्य आहे. दक्षिण आफ्रिकेने साखळी फेरीतील चारही सामने जिंकलेत. तर सुपर 8 मधील पहिल्या सामन्यात यूएसएवर विजय मिळवलाय. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडने साखळी फेरीत 2 सामने जिंकून सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवला. तर सुपर 8 मध्ये इंग्लंडने विंडिजवर 8 विकेट्सने विजय मिळवला. त्यामुळे आता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे आता या लढतीत दोघांपैकी कोण यशस्वी ठरणार आणि पुढचं पाऊल टाकणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.