आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला विजयासाठी 164 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेला शानदार सुरुवातीनंतरही 170 पारही जाता आलं नाही. दक्षिण आफ्रिकेने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 163 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसाठी क्विंटन डी कॉक आणि डेव्हिड मिलर या दोघांनी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. आता हा सामना जिंकणारा संघ सेमी फायनलमध्ये पोहचेल. त्यामुळे इंग्लंड 164 धावा करणार की दक्षिण आफ्रिका 10 विकेट्स घेणार? याकडे क्रिकेट चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
इंग्लंडने टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक आणि रिझा हेंड्रीक्स या सलामी जोडीने शानदार सुरुवात केली. या दोघांनी 9.5 ओव्हरमध्ये 86 धावांची भागीदारी केली. रिझा 25 बॉलमध्ये 19 धावा करुन आऊट झाला. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या डावाची घसरगुंडी झाली. इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला ठराविक अंतरान झटके दिले आणि कमबॅक करुच दिलं नाही.
क्विंटन डी कॉकने 38 बॉलमध्ये 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 65 धावांची खेळी केली. त्यानंतर हेन्रिक क्लासेनने 13 बॉलमध्ये 8 धावा केल्या. कॅप्टन एडन मारक्रम 1 धाव करुन माघारी परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 4 बाज 113 अशी स्थिती झाली. त्यानंतर काही वेळ डेव्हिड मिलरने काही फटके मारुन दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिलरला फार यश आलं नाही. मिलर 28 बॉलमध्ये 43 धावा करुन आऊट झाला. तर मार्को जान्सेनला भोपळाही फोडता आला नाही. ट्रिस्टन स्टब्स आणि केशव महाराज ही जोडी नाबाद परतली. केशवने 5 आणि ट्रिस्टनने 12 धावा केल्या. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर व्यतिरिक्त मोईन अली आणि आदिल रशीद या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन: एडन मारक्रम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया आणि ओटनील बार्टमन.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन: जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड आणि रीस टोपले.