टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच प्रथम फलंदाजी करत 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानला 20 षटकात सर्व गडीबाद 134 धावा करता आल्या. सुपर 8 फेरीत भारताने अफगाणिस्तानचा 47 धावांनी धुव्वा उडवल्याने मोठा फायदा झाला आहे. भारताच्या खात्यात दोन गुण जमा झाले आहेत. त्यासोबत +2.350 नेट रनरेट झाला आहे. त्यामुळे दोन पैकी आणखी एक सामना जिंकला की उपांत्य फेरीचा मार्ग मोकळा होईल. पण दुसरा सामना भारताला मोठ्या फरकाने जिंकणं गरजेचं आहे. भारताचा पुढचा सामना बांगलादेशसोबत आहेत. बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारताने करू नये. साखळी फेरीत उलटफेर करत बांगलादेशचा संघ सुपर 8 फेरीत पोहोचला आहे.
अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा याने आपलं मन मोकळं केलं. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराहचं कौतुक केलं. “मागच्या दोन वर्षात आम्ही येथे आलो आहोत आणि टी20 खेळलो आहोत. आम्ही त्यासाठी प्लानिंग केली होती. आम्ही आहे त्या परिस्थिती खेळण्याची कला आत्मसात केली आहे. आमची गोलंदाजी खरंच खूप जबरदस्त आहे आणि धावा रोखू शकते. प्रत्येकाने जबाबदारीने भूमिका बजावली. सूर्यकुमार आणि हार्दिकने चांगली भागीदारी केली. बुमराह आमच्यासाठी काय करू शकतो हे आम्हाला माहिती आहे. तो आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कोणत्याही क्षणी जबाबदारी घेण्याची त्याची क्षमता आहे.तो कुठेही खेळला तरी जबाबदारी घ्यायला तो नेहमीच तयार असतो.”
जसप्रीत बुमराहने एकूण 4 षटकं टाकत फक्त 7 धावा दिल्या आणि महत्त्वाचे तीन गडी बाद केले. यात एक षटक निर्धावटाकलं. त्याचा इकोनॉमी रेट हा 1.80 इतका आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीपुढे अफगाणिस्तानचं काही एक चाललं नाही. पहिल्या षटकापासूनच त्याने अफगाणिस्तानला बॅकफूटवर ढकललं.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.
अफगाणिस्तान (प्लेइंग इलेव्हन): रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इब्राहिम झद्रान, हजरतुल्ला झाझाई, गुलबद्दीन नायब, नजीबुल्ला जद्रान, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान (कर्णधार), नूर अहमद, नवीन-उल-हक, फजलहक फारूकी.