टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाकडून आता अपेक्षा वाढल्या आहेत. गेल्या 11 वर्षांपासून असलेला आयसीसी चषकांचा दुष्काळ दूर करण्याची संधी चालून आली आहे. या स्पर्धेत बरेच हिशेब चुकते करण्याची संधी रोहित सेनेसमोर आहे. सुपर 8 फेरीत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड दिला. त्यामुळे अफगाणिस्तानला उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळाली. एका अर्थाने टीम इंडियाने वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील वचपा काढला असंच म्हणावं लागेल. कारण सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचं रौद्ररूप पाहायला मिळालं. रोहित शर्माने आक्रमकपणे 92 धावांची खेळी केली. गोलंदाजांवर तुटून पडला होता. जसं काय त्याची वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील जखम ताजी झाल्यासारखं वाटत होतं. इतकंच काय तर ऋषभ पंतने जेव्हा सोप झेल सोडला तेव्हा कधी नव्हे तर रोहितचा राग अनावर झाला. त्याने भर मैदानातच पंतला खडे बोल सुनावले. असं असताना या विजयाचं विश्लेषण मुंबई पोलिसांनी वेगळ्याच पद्धतीने केलं आहे. क्रिप्टीक पोस्टच्या माध्यमातून मोठा संदेश दिला आहे.
मुंबई पोलिसांनी रोहित शर्माचा हसरा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. “जेव्हा तुम्ही 19NOV2023 या जुन्या पासवर्डपासून 24JuN€ @2024 असा अधिक मजबूत पासवर्ड तयार करता!”, असं मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जुना पासवर्ड तर बदलाच वरून त्यात सिम्बोल टाका असा सल्ला दिला आहे. यामुळे पासवर्ड मजबूत आणि सुरक्षित राहील असं सांगणं आहे. मुंबई पोलिसांनी केलेली ही पोस्ट आता वेगाने व्हायरल होत आहे. या पोस्टखाली अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
https://twitter.com/MumbaiPolice/status/1805304353009623423
दरम्यान, टीम इंडियाची उपांत्य फेरीत इंग्लंडशी लढत आहे. या सामन्यातही टीम इंडियाला वचपा काढण्याची संधी आहे. टीम इंडियाला 2022 टी20 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने पराभूत केलं होतं. 10 गडी राखून टीम इंडियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. आता पुन्हा एकदा हे दोन्ही संघ उपांत्य फेरीत भिडणार आहे. त्यामुळे आता या सामन्यात कोण बाजी मारते? याची उत्सुकता लागून आहे. टीम इंडियाचा उपांत्य फेरीचा सामना 27 जूनला गयाना येथे भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे.