आयसीसीच्या नव्या नियमाचा पहिला फटका अमेरिकन संघाला बसला. भारताविरुद्धचा सामना रंगतदार वळणावर आला असताना 5 धावांची पेनल्टी बसली. आयसीसीच्या नियमानुसार षटक संपल्यानंतर दुसरं षटक 60 सेकंदात सुरु करणं गरजेचं आहे. पण ही चूक दोन वेळा केली तर पंचांकडून वॉर्निंग दिली जाते. मात्र तिसऱ्यांदा अशीच चूक केली तर मात्र प्रतिस्पर्धी संघाला 5 धावा दिल्या जातात. असंच भारत अमेरिका सामन्यात घडलं. एकतर खेळपट्टीवर धावा करताना फलंदाजांना अडचण होत होती. मात्र अशाच पेनल्टीच्या रुपाने भारताला पाच धावा मिळाल्याने फायदा झाला. खेळाडूंच्या डोक्यावरील धावांचं ओझं कमी झालं आणि झटपट धावा करण्यासाठी बळ मिळालं. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबेने संधीचं सोनं केलं आणि सामना जिंकवला. या सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आपलं मत व्यक्त केलं आहे.
वीरेंद्र सेहवागने क्रिकबझशी बोलताना सांगितलं की, “उशिरा षटक सुरु केल्याने पाच धावा देण्याऐवजी कर्णधारावर एका सामन्याची बंदी घातली पाहीजे. कोणत्या गोलंदाजाला आपल्या कर्णधारावर राग असेल तर तो षटक उशिरा टाकेल आणि त्याला पुढच्या सामन्यात खेळण्यापासून रोखेल.” दुसरीकडे, अमेरिकेचे हेड कोच स्टुअर्ट लॉ यांनी या चुकीवर नाराजी व्यक्त केली आहे. स्टुअर्ट लॉ यांनी सांगितलं की, “आम्हाला यापूर्वीच्या सामन्यात इशारा देण्यात आला होता. आम्ही षटकं लवकर टाकली पाहीजे होती. पण नवी टम आहे आणि आम्हाला सुधारणा करणं गरजेचं आहे.”
अमेरिकन संघ टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे. अमेरिकेची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवला. पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला लोळवलं. इतकंच काय तर भारतालाही विजयासाठी चांगलंच झुंजवलं. आता अमेरिकन संघ सुपर 8 फेरीपासून एक पाऊल दूर आहे. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवताच सुपर 8 फेरीचं तिकीट पक्कं होईल. अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना शुक्रवारी फ्लोरिडात होणार आहे. पण पावसामुळे या ठिकाणी सामना होणं कठीण दिसत आहे. अशात पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं.