टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील ब गटात स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, इंग्लंड आणि ओमान हे पाच संघ आहे. तसं पाहिलं तर या गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे दिग्गज संघ आहेत. मात्र या गटात मोठा उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या गटातून ओमानने तीन पैकी तीन सामने गमवले असून सुपर 8 फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे. साखळी फेरीतून बाद होणारा ओमान हा पहिला संघ आहे. त्यामुळे या गटातून सुपर 8 फेरीसाठी स्कॉटलँड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया आणि इंगलंडमध्ये चुरस आहे. पण पावसामुळे इंग्लंड विरुद्ध स्कॉटलँड सामना रद्द झाल्याने या गटातील चित्रच बदललं आहे. स्कॉटलँडने आतापर्यंत तीन सामने खेळले असून 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला आहे. स्कॉटलँडचा संघ 5 गुण आणि +2.164 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. स्कॉटलँडचा शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत या गटात दोन सामने खेळले असून 2 पैकी 2 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाचे उर्वरित दोन सामने नामिबिया आणि स्कॉटलँडशी आहे. या दोन पैकी एका सामन्यात विजय मिळवला की ऑस्ट्रेलियाचा सुपर 8 फेरीचं पक्कं होईल. मात्र इंग्लंडची वाट खूपच बिकट झाली आहे. कारण इंग्लंडला अजून दोन सामने खेळायचे आहेत. आतापर्यंत खेळलेल्या दोन पैकी एका सामन्यात पराभव, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवला तरी 5 गुण होतील. त्यामुळे स्कॉटलँड आणि इंग्लंड यांच्यातील फैसला आता नेट रनरेटवर होईल.
नामिबियाने आतापर्यंत दोन सामने खेळले असून एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या सारखे दोन दिग्गज संघ समोर आहेत. त्यामुळे नामिबियाचा निभाव लागणं तसं कठीण आहे. त्यामुळे एका सामन्यात पराभव होताच नामिबियाचा पुढचा मार्ग बंद होईल. दुसरीकडे, इंग्लंडचं पुढचं गणित ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. स्कॉटलँडला मोठ्या फरकाने पराभूत केलं तर नेट रनरेटमध्ये फायदा होईल. पण इंग्लंडला उर्वरित दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील.