भारत अमेरिका सामन्यानंतर 250 कोटींचं नासाऊ स्टेडियम स्वाहा:, जाणून घ्या का तोडत आहेत ते

| Updated on: Jun 13, 2024 | 3:56 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं पहिल्यांदाच अमेरिकेत आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी अमेरिकेत जबरदस्त तयारी करण्यात आली होती. मात्र आता नासाऊ स्टेडियम नकाशावर दिसणार नाही. 250 कोटी खर्च करून बांधलेलं हे स्टेडियम आता तोडलं जाणार आहे. भारत अमेरिका सामना झाल्यानंतर ही तोडक कारवाई सुरु करण्यात आली आहे.

भारत अमेरिका सामन्यानंतर 250 कोटींचं नासाऊ स्टेडियम स्वाहा:, जाणून घ्या का तोडत आहेत ते
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील 25 वा सामना भारत अमेरिका यांच्यात पार पडला. हा सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. या विजयासह भारताने सुपर 8 फेरीत धडक मारली आहे. भारत अमेरिका यांच्यातील नासाऊ स्टेडियममधील हा शेवटचा सामना होता. तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियम या सामन्यानंतर नकाशावरून गायब होत आहे. तुम्हाला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी नासाऊ स्टेडियम तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलं होतं. या मैदानात टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीचे सामने आयोजित करण्यात आले होते. याच मैदानावर भारत पाकिस्तान सामना झाला होता. आता या मैदानावरील सर्व नियोजित सामने संपल्याने हे मैदानात तोडण्याचं काम सुरु झालं आहे. स्टेडियम पाडण्यासाठी बुल्डोझर आणि क्रेन पोहोचल्या आहेत. या मैदानातील खेळपट्टी तयार करण्यासाठी फक्त 106 दिवसांचा अवधी लागला होता. तसेच 250 कोटी रुपय खर्च झाला होता. हे मैदान भविष्यात नसलं तरी हे मैदान सर्वात कमी स्कोअरसाठी चर्चेत राहील.

न्यूयॉर्कमधील नासाऊ स्टेडियमने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. जगातील सर्वात मोठं मॉड्यूलर स्टेडियम होतं. या मैदानात 30 हजार लोकांना बसण्याची सुविधा करण्यात आली होती. इतकंच काय ऑस्ट्रेलियातून ड्रॉप इन खेळपट्ट्या मागवून त्या बसवण्यात आल्या होत्या. पण या खेळपट्ट्यांवर फलंदाजांचा चांगलाच घाम निघाला. चेंडू बॅटवर कधी कसा येईल या संभ्रमात फलंदाज खेळताना दिसले. इतकंच काय तर 100 च्या आसपास असलेली धावसंख्याही गाठणं कठीण झालं होतं. नासाऊ स्टेडियममध्ये एकूण 8 सामने खेळले गेले. यात सर्वाधिक धावसंख्या ही 137 राहिली. तर भारताने धावांचा पाठलाग करताना या मैदानात 110 धावसंख्या गाठली आहे.

या मैदानात पूर्वी एक मैदान होतं त्याला त्याचं मूळ स्वरूप पुन्हा एकदा प्राप्त होणार आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना कोणत्याही अडचणीशिवाय तेथे येण्याजाण्याची सुविधा मिळेल. या मैदानातील खेळपट्ट्यांचं काय केल जाईल याबाबत मात्र अजून काही निश्चित नाही. आयसीसीच्या मते, यावर नासाऊ काउंटीच्या अधिकाऱ्यांना निर्णय घ्यायचा आहे. जर त्यांनी या खेळपट्ट्या सांभाळून ठेवण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना त्याची काळजी घ्यावी लागेल. जर तसं करणार नसतील तर आयसीसी या ड्रॉप इन खेळपट्ट्या रिलोकेट करतील.