Video : टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पंचांच्या चुकीचा बसला फटका, कर्णधार-कोच भडकले

| Updated on: Oct 04, 2024 | 10:04 PM

भारत आणि न्यूझीलंड सामन्यात एक निर्णयामुळे चांगलाच वाद झाला आहे. पंचांच्या एका चुकीचा फटका टीम इंडियाला बसला आहे. त्यामुळे भारताचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर आणि कोच चांगलेच संतापलेले दिसले. नेमकं काय झाले ते वाचा

Video : टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला पंचांच्या चुकीचा बसला फटका, कर्णधार-कोच भडकले
Image Credit source: Alex Davidson-ICC/ICC via Getty Images
Follow us on

वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील चौथा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर न्यूझीलंडने फलंदाजीला प्राधान्य दिलं. न्यूझीलंडने खेळपट्टीचा अंदाज घेत पहिल्या चेंडूपासून आक्रमक सुरुवात केली होती. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहणार याबाबत काहीच शंका नव्हती. त्यामुळे धावसंख्या रोखायची तर विकेट खूपच महत्त्वाची होती. पण भारताला पंचांच्या एक चुकीचा फटका बसला आहे. पंचांनी अशी चूक केली की यापूर्वी असा प्रकार कधीच ऐकिवात किंवा पाहण्यात आला नव्हता. त्यामुळे कर्णधार हरमनप्रीत कौर चांगलीच संतापली. कारण एक विकेट हातून जाणं म्हणजे काय होऊ शकतं याची तिला जाणीव होती. दुसरीकडे, भारतीय कोचही ड्रेसिंग रुममधून बाहेर येत चौथ्या पंचांशी चर्चा करत होते. न्यूझीलंड फलंदाजी करत असताना 14व्या षटकात हा धक्कादायक प्रकार घडला. कर्णधार हरमनप्रीत कौरने फिरकीपटू दीप्ती शर्माच्या हाती चेंडू सोपवला होता.

दीप्तीच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडची एमेली कर्र समोर होती. तिने लाँग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला आणि वेगाने एक धाव पूर्ण केली. तसेच दुसरी धाव घेण्यासाठी कॉल घेतला. तिथपर्यंत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरच्या हातात चेंडू आला आणि तिने लगेचच विकेटकीपर हातात फेकला. विकेटकीपर ऋचा घोषने कोणतीही चूक न करता बॉल स्टंपला लावला आणि विकेटसाठी अपील केली. त्यात एमेली कर्र स्पष्ट बाद असल्याने तंबूच्या दिशेने चालू लागली. पण वाद येथेच सुरु झाला. कारण ती बाउंड्री पोहोचत नाही तोच चौथ्या पंचांनी तिला पुन्हा बोलवलं. त्यामुळे भारतीय खेळाडूंना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी पंचांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली नेमकं असं का ते.

झालं असं की जेव्हा खेळाडूंनी जेव्हा एक धाव घेतली होती, तेव्हा पंचाने गोलंदाज दीप्ती शर्माकडे तिची टोपी सोपवली. असं करणं म्हणजेच षटक संपलं असा अर्थ होतो. याच आधारावर चौथ्या पंचांनी डेड बॉल घोषित केला आणि रन आऊट नसल्याचं घोषित केलं.

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या खात्यातही दुसरी धाव गेली नाही. पंचांनी एकच धाव मिळेल असं घोषित केलं. पण भारतीय खेळाडूंचा महत्त्वाचा सामन्यात संताप झाला. मोठ्या स्पर्धेत एक एक विकेट महत्त्वाची असते. कर्माची फळं भोगावी लागतात असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. एमेली पुढच्याच चेंडूवर झेल बाद झाली.