नवी दिल्ली – विश्वकप (World Cup) जिंकणं हे कोणत्याही क्रिकेटरचं सर्वात मोठं स्वप्न असतं. भारताला टी-20 विश्वचषक जिंकून बरीच वर्षे झाली आहे. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) स्पर्धेत भारताचा भर हा एवढ्या वर्षांचा वनवास संपवण्यावर असणार आहे. त्यासाठी तयारी भारतीय टीमच्या ताफ्यात आत्तापासूनच सुरू आहे. यंदा विश्वचषकासाठी उतरणारा संघ हा नवा कोच आणि नव्या कर्णधारासह (Rohit Sharma) उतरणार आहे. राहुल द्रविडच्या नेतृत्वात टीम इंडिया यावेळी वेगवेगळ्या सीरिजमध्ये खेळत आहे. आता त्यांची नजर टी-20 वर्ल्ड कपवर आहे. द. अफ्रिकेविरोधात सुरु असलेल्या टी-20 सीरिजनंतर टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. तिथून खरी मिशन वर्ल्कपची सुरुवात असेल. आता बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी वर्ल्डकप मिशनबाबत माहिती दिली आहे. कोच राहुल द्रविड कशी टीम तयार करीत आहेत, याची माहिती गांगुलींनी दिली आहे. याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सौरव गांगुली यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की आयसीसी इव्हेन्टमध्ये ज्या प्रकारे टीम इंडियात सतत बदल दिसत आहेत, त्याच्याबाबत काय सांगाल, यावर त्यांनी उत्तर दिले की राहुल द्रविड यांचे याच्याकडे विशे।ष लक्ष आहे. काही प्लेअर्सना एका स्टेजवर एकत्र कसे खेळवता येईल, याची योजना राहुल द्रविड करत असल्याची माहिती गांगुली यांनी दिली आहे. इंग्लंड दौऱ्यापासून ऑक्टोबरमध्ये जे प्लेअर्स टी-20 वर्ल्डकप खेळणार आहेत, असेच क्रिकेटर खेळताना पाहायला मिळतील, असेही गांगुलींनी सांगितले आहे.
टीम इंडिया सध्या द. अफ्रिकेसोबत टी-20 सीरिज खेळत आहे. ज्यात ऋषभ पंत टीम इंडियाची कॅप्टन्सी सांभाळतो आहे. तर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सारखे क्रिकेटर्स या सीरिजमध्ये सहभागी नाहीत. के एल राहुल पहिल्यांदा सीरिजमध्ये होता, मात्र दुखापतीमुपळे तो बाहेर आहे.
या दौऱ्यानंतर भारताचे विशेष लक्ष इंग्लंड दौऱ्याकडे आहे. 1 जुलैपासून तिथे टेस्ट मॅच होणार आहे, त्यानंतर तीन टी-20 आणि तीन वन डे खेळवण्यात येणार आहेत. 2021 साली टी-20 वर्ल्ड कपमध्ये खराब कामगिरीनंतर, आता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपकडे सगळ्यांचे लक्ष आहे. टीम इंडियाही यासाठी जोरदार प्रयत्न करणार आहे. रोहित शर्माच्या कॅप्टन्सीत आणि राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात टीम इंडिया इतिहास रचण्याच्या तयारीत आहे.