ind vs aus : महिला भारतीय संघाचा सेमी फायनल सामन्यामधील झालेला पराभव जखमेवर मीठ चोळल्यासारखा आहे. कारण मागील वर्ल्ड कपमध्येही भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पराभूत केलं होतं. त्यामुळे भारताच्या रणरागिणी पराभवाचा वचपा काढतील असा विश्वास सर्वांना होता मात्र तसं काही झालं नाही. अवघ्या 5 धावांनी भारतीय संघाचा पराभव झाला. भारताच्या पराभवाची प्रमुख कारणं आहेत ज्यामुळे फायनलचं तिकीट भारताला मिळालं नाही.
भारताच्या पराभवाच्या कारणांमधील हे एक कारण जे फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही. भारतीय खेळाडूंनी केलेली खराब फिल्डिंग, यामुळे भारताकडून ऑस्ट्रेलियाच्या संघाला अतिरिक्त धावा गेल्या. ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगचा झेल रिचा घोषला घेता आला नाही. त्यानंतरच्या दुसऱ्याच षटकात परत एकदा झेल सुटला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची बेथ मुनी फलंदाज खेळत होती. दोन्ही फलंदाजांचे झेल सोडले गेले होते त्यावेळी मेग लॅनिंग 1 धाव आणि बेथ मुनीच्या 32 धावा झाल्या होत्या. त्यानंतर बेथ मुनीने 52 तर मेग लॅनिंगने नाबाद 49 धावा केल्या.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी सुरूवातीला धावा दिल्या होत्या मात्र डेथ ओव्हर्समध्ये रन रेट मापात ठेवला होता. ऑस्ट्रेलियाच्या19 ओव्हर्समध्ये 154 धावा झाल्या होत्या. त्यावेळी अनुभवी रेणुकाने संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. मात्र शेवटच्या षटकात तिला जवळजवळ 18 धावा निघाल्या आणि टीम इंडियाला 170 पेक्षा जास्त धावांचं आव्हान मिळालं. त्यामुळे एक दबाव फलंदाजांवर झाला होता जो सुरूवातीलाच दिसून आला.
भारतीय महिला संघाची लेडी सेहवाग म्हणून ओळखली जाणारी शफाली वर्माची बॅट पूर्ण स्पर्धेत थंड दिसली. त्यामुळे आजच्या सेमी फायनल सामन्यात काहीतरी करिष्मा दाखवत संघाला चांगली सुरूवात करून देईल अशी आशा सर्वांना होती. मात्र दुसऱ्याच षटकात शफाली बाद झाली. स्मृती मंधानाला आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लागली कारण तिने तेवढं नाव कमावलं आहे. परंतु तिलाही काही आज चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यानंतर यास्तिका भाटिया रन आऊट झाली. अनुक्रमे 9,2,4 धावांवर टॉप आर्डर फ्लॉप गेली.
जेमिमा रॉड्रिग्ज आली त्यावेळी दोन मुख्य बॅटर बाद झाल्या होत्या. यास्तिका भाटिया जेमिमा या दोघींना डाव सावरायचा होता. मात्र यास्तिका रनआऊट होते त्यानंतर जेमिमाने कर्णधार हरमनप्रीतसोबत 68 धावांची भागीदारी केली होती. मात्र एक चुकीचा फटका खेळून ती बाद होते. याचवेळी सामना काहीसा ऑस्ट्रेलियाच्या पारड्यात झुकल्यासारखा झाला होता. जर तो चुकीचा फटका न खेळता भागीदारी सुरू ठेवली असती तर कदाचित सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण जेमिमासोबत हरमनप्रीत चांगली भागीदारी करत एकप्रकारे फायनलच्या दिशेने जायचा पायाच रचू लागली होती. जेमिमा बाद झाली आणि त्यानंतर दुहेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हरमनप्रीतही रनआऊट झाली. या रनआऊटने सर्वांना महेंद्रसिंह धोनीच्या 2019 मधील सेमी फायनलमधील रनाआऊटची आठवण झाली.