Team India: टीम इंडियाचे 3 स्टार पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज, 2 मुंबईकर

| Updated on: May 28, 2024 | 4:52 PM

Indian Cricket Team: आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होत आहे. रोहितसेना या स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडियाचे 3 खेळाडू हे पहिल्यांदाच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत.

Team India: टीम इंडियाचे 3 स्टार पहिल्यांदा वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी सज्ज, 2 मुंबईकर
virat rohit team india
Image Credit source: BCCI
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेसाठी टीम इंडियाची पहिली तुकडी ही अमेरिकेत पोहचली आहे. तर दुसरी तुकडी येत्या काही तासात रवाना होणार आहे. या स्पर्धेला 2 जूनपासून सुरुवात होणार आहे.या स्पर्धेत एकूण 20 संघामध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे. टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृ्त्वात वर्ल्ड कप स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यांविरोधात 2 हात करणार आहे. टीम इंडियात अनुभवी खेळाडूंसह युवा चेहऱ्यांना संधी देत समतोल साधला गेला आहे. टीम इंडियाच्या गोटात असे 3 खेळाडू आहेत, जे पहिल्यांदाच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहेत. या 3 पैकी 2 खेळाडू हे मुंबईचे आहेत. या 3 खेळाडूंनी नुकत्याच पार पडललेल्या आयपीएलच्या 17 व्या मोसमात विस्फोटक बॅटिंग केली आहे.

विकेटकीपर बॅट्समन संजू सॅमसन, ओपनर यशस्वी जयस्वाल आणि ऑलराउंडर शिवम दुबे या तिघांनी आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली. संजूने कॅप्टन्सी, बॅटिंग आणि विकेटकीपिंग या तिन्ही भूमिकांना न्याय दिला. यशस्वीने राजस्थान रॉयल्सला चांगली सुरुवात करुन देण्यात निर्णायक भूमिका बजावली. तर शिवमने आयपीएलमधील धमाकेदार कामगिरीच्या जोरावर टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं. त्यावरुन दुबेच्या कामगिरीचा अंदाज बांधता येईल. संजू, शिवम आणि यशस्वी या तिघांची टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची पहिलीच वेळ असणार आहे. या तिघांना मुख्य संघात समावेश आहे.

संजू सॅमसनसमोर ऋषभ पंतचं आव्हान असणार आहे. विकेटकीपिंग हा दोघांमध्ये कॉमन फॅक्टर आहे. त्यामुळे प्लेईंग ईलेव्हनमध्ये विकेटकीपर म्हणून दोघांपैकी कुणा एकालाच संधी मिळेल. त्यामुळे आता संजू की पंत कुणाला संधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. संजूला संधी मिळाल्यास त्याचं टी 20 वर्ल्ड कपमधील पदार्पण ठरेल.

मुंबईकर यशस्वी जयस्वाल याने आयपीएलच्या 17 व्या हंगामात 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 435 धावा केल्या. यशस्वीला आयपीएलमधील टी 20 फॉर्मेटचा टी 20 वर्ल्ड कपसाठी चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे यशस्वी टीम इंडियाला चांगली सुरुवात मिळवून देईल, अशी आशा भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. तसेच शिवम दुबे याचा ऑलराउंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. शिवम दुबेने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 14 सामन्यांमध्ये 396 धावा केल्या. त्यामुळे या तिघांकडून आयपीएलप्रमाणेच या महत्त्वपूर्ण स्पर्धेत चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान