मुंबई | बीसीसीआयने मंगळवारी 25 एप्रिल रोजी आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलसाठी 15 सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला. या 15 सदस्यीय संघाचं नेतृ्त्वाची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे असणार आहे. या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निमित्ताने अजिंक्य रहाणे याला बीसीसीआयने संधी दिली. रहाणेची टीम इंडियात 16 महिन्यांनी एन्ट्री झाली. रहाणे अखेरचा कसोटी सामना 2022 मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध खेळला होता. रहाणेला या दरम्यानच्या काळात टीमपासून दूर राहिल्याने अडचणींचा सामना करावा लागला. मात्र रहाणेने जिद्द, ध्येय चिकाटीच्या जोरावर संघात संधी देण्यास बीसीसीआयला भाग पाडलं.
रहाणेचं भारतीय संघात निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर भरभरून कौतुक करण्यात आलंय. अपयश दे पण कमबॅकही रहाणेसारखंच दे, अशा शब्दात चाहत्यांनी रहाणेच्या पुनरागमनावर पोस्ट केल्या. आता रहाणेची निवड झाल्यानंतर चाहत्यांनाच इतका आनंद झालाय. मग स्वत: रहाणेला काय वाटत असेल? रहाणेने या 16 महिन्यांच्या वेटिंग पीरियडबाबत एकूनएक शब्द लिहून आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. रहाणेचे हे शब्द आयुष्यात अयशस्वी झालेल्या प्रत्येकाला नव्याने उभारी घेण्यास नक्कीच प्रेरणादायी ठरतील असेच आहे.
आयुष्यात प्रत्येकाला संकटाचा सामना करावा लागतो. संघर्ष हेच जीवन आहे, असं म्हटलं जातं. जीवनात चढ-उतार सुरुच असतात. असाच चढ उताराचा सामना रहाणेला करावा लागला. मात्र रहाणेने न डगमगता, न खचता देशातंर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय आणि अफलातून कामगिरी केली. त्यानंतर अखेर रहाणेची संघात एन्ट्री झाली.
रहाणेने क्रिकेटमधील प्रवास आणि आव्हानांबाबत सांगितंलंय. “एक व्यावसायिक क्रिकेटर म्हणून कारकीर्दीत प्रवास सोपा नसतो हे अनुभवलंय. आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा अपेक्षेप्रमाणे काही घडत नाही. तसेच आपल्या विरोधात जाणाऱ्या निर्णयांमुळे आपण हैराण होतो. मात्र आपण प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. तसेच प्रयत्नांना मिळणाऱ्या निकालाचा परिणाम आपल्यावर होऊ देता कामा नये”, असं रहाणेने म्हटलंय.
“मी कारकीर्दीकडे पाहतो तेव्हा जाणवतं की, माझ्या विरोधात गेलेल्या निर्णयांनंतर काही असे क्षण आले ज्यातून मी खूप शिकलो. त्या क्षणांमुळे माझा एक व्यक्ती आणि क्रिकेटर म्हणू विकास होण्यात हातभार लागला”, असंही रहाणेने नमूद केलं.
दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल 7 ते 11 जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात पावसामुळे व्यत्यय येऊ नये, यासाठी आयसीसीने 12 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. टीम इंडियाची ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळण्याची दुसरी वेळ असणार आहे. याआधी टीम इंडियाला 2021 मध्ये न्यूझीलंडकडून अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.
पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.