मुंबई : टीम इंडियाचा स्टार बॅट्समन सूर्यकुमार यादव याचा धमाका सुरुच आहे. सूर्यकुमार टीम इंडियात पदार्पण केल्यापासून उल्लेखनीय कामगिरी करत आलाय. सूर्याने 2022 या वर्षात टी 20 क्रिकेट प्रकारात धमाकेदार कामगिरी केली. त्याने टीम इंडियाला अनेक सामने हे एकहाती जिंकून दिले. आयसीसीने या कामगिरीची दखल घेत सूर्याची सर्वोत्तम टी 20 फलंदाज 2022 हा पूरस्कार जाहीर केला आहे. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सूर्याची आकडेवारी पाहता आयसीसीने सूर्यासह झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा, इंग्लंडचा सॅम करन आणि पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान या चौघांची निवड केली होती. मात्र अखेर सूर्याच्या नावाला पसंती देण्यात आली. अशाप्रकारे सूर्याने या तिघांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
सूर्याने 2022 साली टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. यामध्ये 2 शतकांचा समावेश होता. या दरम्यान सूर्यकुमार आयसीसी रँकिंगमध्ये अव्वल स्थानी अर्थात पहिल्या क्रमांकावरही पोहचला. सूर्याने अद्याप पहिलं स्थान कायम राखलं आहे.
सूर्याने 2021 मध्ये टी 20 डेब्यू केलं. त्यानंतर सूर्याने 2022 मध्ये अफलातून कामगिरी केली. सूर्याने आपल्या चौफेर फटकेबाजीने चाहत्यांच्या मैदानात घर केलं. सूर्याने मैदानात उलटसुलट फटके मारत खोऱ्याने धावा केला.
सूर्यकुमार चमकला
Presenting the ICC Men’s T20I Cricketer of the Year 2022 ?#ICCAwards
— ICC (@ICC) January 25, 2023
सूर्या 2022 मध्ये सर्वाधिक टी 20 धावा करणारा बॅट्समन ठरला. सूर्याने 31 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार 164 धावा केल्या. यामध्ये सूर्याचा 46.56 ची सरासरी होती. तसेच सूर्याचा स्ट्राईक रेट हा इतर फलंदाजांच्या तुलनेत जबरदस्त होता. सूर्याने 1 हजार 164 धावा या 187.43 च्या सरासरीने केल्या. या दरम्यान सूर्याने इंग्लंड आणि न्यूझीलंड विरुद्ध शतकही ठोकलं.
तसेच सू्र्याने ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमधील 6 डावांमध्ये 59.75 च्या सरासरीने आणि 189.68 च्या स्ट्राईकर रेटने 239 धावा केल्या. सूर्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण तिसरा तर विराटनंतर सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला.