मुंबई | क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईकरांचं टीम इंडियातलं वजन आणखी वाढलं आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही रोहित शर्मा याच्याकडे आहे. कसोटी क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आहे. तर आता बीसीसीआयकडून मुंबईकर दिग्गज खेळाडूची मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पहिल्या टी 20 वर्ल्ड कप विजेत्या संघातील मराठमोळा खेळाडू निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाला आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर यांची निवड समिती अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा हे याआधी निवड समितीचे अध्यक्ष होते. मात्र एका वाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनंतर शर्मा यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून निवड समिती अध्यक्ष हे पद रिक्त होतं. मात्र आता आगरकर यांच्या रुपाने निवड समिती अध्यक्ष मिळाले आहेत. क्रिकेट सल्लागार समितीतील जतीन परांजपे, सुलक्षणा नाईक आणि अशोक मल्होत्रा यांनी ही निवड केली.
निवड समिती अध्यक्षपदी अजित आगरकर
? NEWS ?: Ajit Agarkar appointed Chairman of Senior Men’s Selection Committee.
Details ?https://t.co/paprb6eyJC
— BCCI (@BCCI) July 4, 2023
अजित आगरकर यांना बॉम्बे डक असंही म्हटलं जातं. आगरकर यांनी टीम इंडियात वेगवान गोलंदाज म्हणून भूमिका बजावली. मात्र गोलंदाजीसह बॅटिंगमध्येही त्यांनी मोठे विक्रम केले.
झिंबाब्वे विरुद्ध अजित आगरकर यांनी 2000 या वर्षात 21 बॉलमध्ये वेगवान अर्धशतक केलं होतं. अजित आगरकर यांचा हा विक्रम अजूनही ब्रेक झालेला नाही. ऐवढंच नाही, तर आगरकरने लॉर्ड्सवर शतक केलंय. प्रत्येक बॅट्समनचं लॉर्ड्सवर शतक करण्याचं स्वप्न असतं. मात्र प्रत्येकाचं ते स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. इतकंच काय, तर शतकांचं शतक ठोकलेल्या सचिन तेंडुलकर यालाही लॉर्डसवर शतक करता आलेलं नाही.
शेवटचं पण महत्वाचं म्हणजे टीम इंडियाने 2007 मधील पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. या वर्ल्ड कप विजेता संघाचे अजित आगरकर हे सदस्य होते.
अजित आगरकर यांनी टीम इंडियाचं 191 वनडे, 26 कसोटी आणि 4 टी 20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. आगरकर यांनी एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 क्रिकेटमध्ये अनुक्रमे 58, 288 आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच आगरकरने वनडेत 3 अर्धशतकांसह 1 हजार 269, कसोटीत 1 शतकासह 571 आणि टी 15 धावा केल्या आहेत.