“टीम इंडियाचे स्टार निर्णय आपल्या पक्षात यावा यासाठी…”, पंच नितीन मेनन यांच्या वक्तव्याने खळबळ

| Updated on: Jun 17, 2023 | 6:55 PM

पंच नितीन मेनन गेल्या तीन वर्षांपासून पंचगिरी करत आहेत. त्यांचे काही निर्णय सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. आता त्यांनी टीम इंडियातील स्टार खेळाडूंबाबत वक्तव्य करत खळबळ उडवून दिली आहे.

टीम इंडियाचे स्टार निर्णय आपल्या पक्षात यावा यासाठी..., पंच नितीन मेनन यांच्या वक्तव्याने खळबळ
पंच नितीन मेनन पुन्हा एकदा चर्चेत, आता टीम इंडियाबाबत केलं धक्कादायक वक्तव्य
Follow us on

मुंबई : क्रिकेटमध्ये पंचगिरी करणं वाटतं तितकं सोपं नाही. मोठे संघ आणि स्टार खेळाडूंबाबत निर्णय देताना अनेकदा दबाव पंचांवर असतो. कारण पंचांची एक चूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते. नितीन मेनन यांनी आपल्या पंचगिरीने कायमच लक्ष वेधून घेतलं आहे. मागच्या तीन वर्षात त्यांनी अनेक सामन्यांमध्ये पंचाची भूमिका बजावली आहे. आता नितीन मेनन यांनी भारतीय संघाच्या स्टार खेळाडूंबाबत धक्कादायक वक्तव्य करून खळबळ उडवली आहे. नितीन मेनन यांनी सांगितलं आहे की, ‘मागच्या तीन वर्षातील दबावामुळे आयसीसी एलीट पॅनेल अंपायरिंग विकसित होण्यास मदत झाली आहे.’ नितीन मेनन यांना मागच्या दोन टी 20 विश्वचषकात पंचगिरी करण्याची संधी मिळाली होती. विश्वचषक संयुक्त अरब अमीरात आणि ऑस्ट्रेलियात खेळले गेले होते.

नितीन मेनन यांनी आतापर्यंत 15 कसोटी, 24 वनडे आणि टी20 च्या 20 सामन्यात पंचगिरी केली आहे. आता मेनन शेवटच्या तीन अॅशेज कसोटी सामन्यात पंचाची भूमिका बजावण्यासाठी सज्ज आहेत. हायव्होल्टेज सामन्यात सक्षमपणे पंचाची भूमिका बजावणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “ही एक चांगली मालिका आहे. मी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका मालिकेत पंचांची भूमिका बजावली आहे. मला बेझबॉल काय आहे माहिती आहे. प्रत्येक सामन्यात बरंच काही घडणार आहे. पण मी बेसिक्सवर लक्ष केंद्रीत करून निर्णय घेईल.”

आपल्या बाजून निर्णय यावा यासाठी भारतीय स्टार दबाव आणतात

पंच नितीन मेनन यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “भारतात दबावात पंचगिरी केल्यानंतर विदेशी सामन्यात पंचगिरी करणं सोपं झालं आहे. टीम इंडिया भारतात खेळते तेव्हा खूपच प्रेशर असतं. टीम इंडियातील दिग्गज खेळाडू कायम दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात. जे निर्णय 50-50 टक्क्यांवर असतात, असे निर्णय आपल्या बाजूने झुकवण्यासाठी प्रयत्न करतात. पण आम्ही त्या दबावावर लक्ष देत नाहीत.”

“यावरून इतकंच सिद्ध होतं की मी प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यास तयार आहे. यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे.” असं त्यांनी पुढे सांगितलं. दुसरीकडे, पंचांना खेळाडूंप्रमाणे शारीरिक आणि मानसिकरित्या सक्षम असणं गरजेचं आहे. कारण मैदानात सहा ते सात तास उभं राहवं लागतं. त्यामुळे आठवड्यातील सहा दिवस रोज 75 मिनिटं जिममध्ये घाम गाळतो, असंही मेनन यांनी पुढे सांगितलं.