मुंबई | टीम इंडिया सध्या आशिया कप 2023 मध्ये खेळत आहेत. या दरम्यान टीम इंडियाचा स्टार बॉलर जसप्रीत बुमराह याला पुत्ररत्न प्राप्त झालं. जसप्रीत बुमराह याची पत्नी आणि स्पोर्ट्स प्रेझेंटेटर असलेल्या पुणेकर संजना गणेशन हीने गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सचा ऑलराउंडर राहुल तेवतिया यालाही कन्यारत्नाचा लाभ झाला. राहुलच्या घरी लक्ष्मीचं आगमन झालं. त्यानंतर आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू लवकरच बापामाणूस होणार आहे.
टीम इंडयाच्या या खेळाडूने स्वत: सोशल मीडिया पोस्ट करत ही गोड बातमी दिली आहे. हा अनुभवी खेळाडू कित्येक महिन्यांपासून टीम इंडियातून दूर आहे. हा क्रिकेटर अखेरीस आयपीएल 16 व्या मोसमात खेळला होता. तेव्हापासून हा क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. टीम इंडियाचा दिग्गज गोलंदाज उंचपुरा ईशांत शर्मा हा लवकरच बाबा होणार आहे. ईशांतची पत्नी प्रतिमा हीने सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय.
प्रतिमा हीने पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये ईशांत-प्रतिमा यांचा फोटो आहे. ईशांतच्या घरी डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे हे फोटो आहेत. या गोड बातमीनंतर ईशांत आणि प्रतिमा या दोघांचं अभिनंदन केलं जात आहे.
ईशांत शर्मा लवकरच बापमाणूस
प्रतिमा शर्मा ही बास्केटबॉल खेळाडू आहे. प्रतिमाने 2003 साली वयाच्या 13 वर्षापासून बास्केटबॉल खेळायला सुरुवात केली. ईशांत आणि प्रतिमा या दोघांची पहिली भेट ही एका स्पर्धेदरम्यान झाली. ईशांत त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा होता. या कार्यक्रमाद्वारे दोघांची ओळख झाली. इथेच दोघांचे सूर जुळले आणि सुरु झाली लव्ह स्टोरी. प्रतिमा आणि ईशांत काही वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर अखेर एकमेकांचा लाईफ पार्टनर म्हणून स्वीकार केला. दोघांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं.