मुंबई | ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये 209 धावांनी पराभव झाला. टीम इंडियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील हा सलग आणि एकूण दुसरा पराभव ठरला. टीम इंडियाच्या या पराभवामुळे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली. या पराभवामुळे आता आगामी मालिकांसाठी टीम इंडियात फेरबदल होण्याची शक्यता आहे. टीम इंडिया विंडिज दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. या दरम्यान टीम इंडियाचा एक खेळाडू संधी न मिळाल्याने निवृत्तीचा निर्णय घेऊ शकतो. टीम इंडियाच्या या खेळाडूला गेल्या 2 वर्षांपासून संधी मिळालेली नाही.
नवदीप सैनी याने टीम इंडियाकडून वनडे, टी 20 आणि टेस्टमध्ये पदार्पण केलंय. नवदीपने 2019 मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध टी 20 पदार्पण केलं. नवदीपने डिसेंबर 2019 मध्ये एकदिवसीय पदार्पण केलं. मात्र कसोटी पदार्पणासाठी नवदीपला 2 वर्ष वाट पाहावी लागली. नवदीपने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 2021 मध्ये टेस्ट डेब्यु केलं. नवदीपने या सामन्यासह एकूण 2 कसोटी सामने खेळले आहेत. नवदीप अखेरचा सामना हा 2 वर्षांपूर्वी खेळला होता. नवदीपने श्रीलंका विरुद्ध हा सामना खेळला होता. त्यामुळे नवदीपला येत्या काळात जर संधी मिळाली नाही तर तो निवृत्ती जाहीर करु शकतो.
नवदीप सैनी याने टीम इंडियाचं 2 कसोटी, 8 वनडे आणि 11 टी 20 सामन्यात प्रतिनिधित्वर केलं आहे. नवदीपने टेस्ट क्रिकेटमध्ये 4, वनडेत 6 आणि टी 20 मध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत. नवदीप सैनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून रणजी टीमसाठी खेळतो. टीम इंडियात नवदीप सैनीने कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये झटपट पदार्पण केलं. मात्र त्यानंतर दुखापतीमुळे आणि काही काळासाठी टीममधून असा बाहेर झाला, की त्याचा निवड समितीलाही विसर पडला.
टीम इंडिया आता वेस्टइंडिज दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियाला वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळायची आहे. 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 टी 20 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टेस्ट सीरिजपासून होणार आहे. कसोटी मालिकेला 12 जुलैपासून सुरुवात होणार आहे. त्यानंतर वनडे आणि टी 20 सीरिज होणार आहे. आता निवड समिती या तिन्ही मालिकांमध्ये नवदीप सैनीचा विचार करते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.