मुंबई | आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करायची संधी मिळावी, अशी इच्छा प्रत्येक क्रिकेटर पर्यायाने खेळाडूची असते. काही खेळाडूंचं ते स्वप्न पूर्ण होतं, कुणाचं नाही. संघात स्थान मिळवल्यानंतर ते टिकवून ठेवणं आणखी आव्हानात्मक असतं. त्यातही दर 4 वर्षाने होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये निवड व्हावी यासाठी प्रत्येक खेळाडू हा आपले 100 टक्के प्रयत्न करतो. रोहित शर्मा याची 2011 साली वनडे वर्ल्ड कपमध्ये निवड न झाल्याने तो निराश झाला. मात्र तो खचला नाही.
रोहितने तितक्यात जोराने गेम दाखवला. पुढील काही वर्षात टीम इंडियातलं चित्र बदललं. धोनी निवृत्त झाला. विराटने कॅप्टन्सी सोडली. रोहितकडे टीम इंडियाची जबाबदारी आली. ज्या रोहितला 12 वर्षांआधी टीममध्ये स्थान नव्हतं मिळालं, तोच आता वर्ल्ड कप टीमचा कॅप्टन होता. रोहितने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना सोबत घेत अफलातून कामगिरी केली.
टीम इंडियाने वर्ल्ड कप 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकत फायनलमध्ये रुबाबात प्रवेश केला. आता टीम इंडिया वर्ल्ड कपपासून एक पाऊल दूर होती. टीम इंडियाची 12 वर्षांनी वर्ल्ड कपची प्रतिक्षा संपणार होती. मात्र टीम इंडियाचं स्वप्न भंग झालं. टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये एकच सामन्यात पराभूत झाली तो म्हणजे फायनल. ट्रेव्हिस हेड याने रोहितचा उलट धावत घेतलेला कॅच आणि त्यानंतर केलेलं शतक यामुळे टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनलमध्ये 2003 नंतर 20 वर्षांनी पुन्हा एकदा पराभूत केलं. असंख्य भारतीय चाहत्यांनी मनं तुटली. कॅप्टन रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. रोहितचे भर मैदानात डोळे भरुन आले. त्यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळली. दक्षिण आफ्रिका दौरा केला. त्यानंतर आता इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे.
वर्ल्ड कप फायनल होऊन आता काही महिने झाले. मात्र रोहितच्या मनात वर्ल्ड कप न जिंकू शकल्याचं शल्य आहे. रोहितने टीम इंडियासाठी प्रत्येक सामन्यात बेछूट आणि निर्भिडपणे बॅटिंग केली. रोहितने 2019 नंतर 2023 मध्ये जोरदार फलंदाजी केली. वैयक्तिक विक्रम केले. मात्र त्याचं रुपांतर हे वर्ल्ड कप ट्रॉफीत होऊ शकलं नाही. रोहितने पुन्हा एकदा वर्ल्ड कप न जिंकण्याची खंत बोलून दाखवली.
रोहितकडून खंत व्यक्त
Rohit bhai 💔💔pic.twitter.com/0Vi84DV7aF
— Aryan 🇮🇳 (@Iconic_Hitman) January 25, 2024
“मी 2019 वर्ल्ड कपमध्ये 500 धावा केल्या. काय झालं? हरलो ना. काही फायदा नाही त्या धावांचा. मला तर ती ट्रॉफी पाहिजे दादा. तुम्ही ट्रॉफी नाही जिंकू शकलात तर त्या 500-600 धावांना काहीच अर्थ नाही. सांघिक खेळ म्हणजे ट्रॉफी जिंकण्यासारखं आहे. सांघिक खेळ म्हणजे तु 5 विकेट्स घेतल्या, मी 4 घेतल्या. याला काही अर्थ उरत नाही”, असं रोहित म्हणाला. रोहितने प्रेझेंटेटर एकेकाळी सोबत खेळलेल्या दिनेश कार्तिक याला मुलाखत दिली. या दरम्यान रोहितने विविध मु्द्द्यांवर प्रतिक्रिया दिली.