रोहित शर्मा याने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात 17 वर्षांनंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितने त्यासह टी 20i क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर आता रोहितचा संपूर्ण फोकस हा वनडे आणि टेस्ट फॉर्मेटकडे आहे. टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. या निमित्ताने रोहितची कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कामगिरी कशी आहे? हे आपण जाणून घेऊयात.
विराट कोहली हा टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. विराटने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला 40 कसोटी सामन्यात विजय मिळवून दिला आहे. रोहित शर्माने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वातील 16 पैकी 10 सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळे रोहितला टीम इंडियाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. मोहम्मद अझहरुद्दीन याने भारताचं 47 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलंय. त्यापैकी 14 सामन्यात टीम इंडियाला विजयी होता आलं. तर तेवढ्याच सामन्यात पराभू व्हावं लागलंय. तर 19 सामने हे अनिर्णित राहिले.
विराटनंतर महेंद्रसिंह धोनी हा कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. धोनीने भारताचं 60 सामन्यात नेतृत्व केलं.त्यापैकी भारतने 27 सामने जिंकले. तर दादा अर्थात सौरव गांगुली याने 47 टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाची कॅप्टन्सी केली. टीम इंडियाला त्यापैकी 21 मॅचमध्ये विजय मिळवता आला. गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तर चौथ्या स्थानी मोहम्मद अझहरुद्दीन आहे. त्यामुळे रोहितने पुढील 4 सामने जिंकल्यास अझहरुद्दीनच्या विक्रमाची बरोबरी होईल. तर 5 सामने जिंकल्यास रोहित टीम इंडियाचा कसोटी क्रिकेटमधील चौथा यशस्वी कर्णधार होईल.
टीम इंडिया बांगलादेश विरुद्ध 2 आणि त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 3 असे एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहे. रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाने या दोन्ही मालिकेत प्रतिस्पर्धी संघाचा क्लीन स्वीप केल्यास हिटमॅन चौथा यशस्वी कर्णधार होईल.