आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी आता मोजून काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमानंतर यूएसए आणि वेस्ट इंडिजमध्ये टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धा पार पडणार आहे. टीम इंडियाही या वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. निवड समितीने 30 एप्रिल रोजी टीम इंडियाचा वर्ल्ड कपसाठीचा संघ जाहीर केला. त्यानुसार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी मैदानात उतरणार आहे. तर हार्दिक पंड्या याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या मुख्य संघात 15 खेळाडू आहेत. तर राखीव म्हणून 4 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. टीममध्ये संजू सॅमसन आणि युझवेंद्र चहल या दोघांचं कमबॅक झालंय. तर रिंकू सिंह आणि शुबमन गिल या दोघांचा राखीव म्हणून समावेश करण्यात नाराजी आहे. मात्र आता टीम इंडियाच्या घोषणेनंतर टीम इंडियाची प्लेईंग ईलेव्हन कशी असेल? असा प्रश्न भारतीय क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर वर्ल्ड कप स्पर्धेच्या 1 महिन्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने दिलं आहे.
“परिस्थितीनुसार आणि प्रतिस्पर्धी संघानुसार अंतिम 11 खेळाडू निश्चित केले जातील”, असं म्हणत रोहित शर्माने प्लेईंग ईलेव्हनचा फॉर्म्युला सांगितला. मुंबईत पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत रोहितने हे उत्तर दिलं. खेळपट्टी कशी आहे? ती कुणासाठी पूरक आहे? हे पाहून अनेकदा कर्णधार आपल्या प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाचा समावेश करायचा आणि कुणाचा नाही, हे ठरवतो. त्यानुसारच रोहितने वर्ल्ड कपसाठीच्या प्लेईंग इलेव्हनचा फॉर्म्युला सांगितला.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू : शुबमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान