मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा चौथा सामना बांगलादेशशी होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास अव्वल स्थान कायम राहणार आहे. तसेच उपांत्य फेरीचं गणितही सोपं होणार आहे. पण बांगलादेशला कमी लेखून चालणार हे देखील तितकंच खरं आहे. गेल्या काही वर्षात बांगलादेश क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक बदल दिसून आले आहेत. आयसीसी स्पर्धेतील एकही चषक नावावर नसलं तरी आपली एक वेगळी छाप सोडली आहे. तसेच वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत नुकतेच दोन मोठे उलटफेर पाहिले गेले आहेत. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. कारण प्रशिक्षक राहुल द्रविड याला याबाबतची चांगली जाणीव आहे. 2007 वर्ल्डकप स्पर्धेत कर्णधार असताना त्याने याची अनुभूती घेतलेली आहे. 2007 वर्ल्डकपमध्ये बांगलादेशकडून पराभूत झाल्याने टीम इंडियाची चांगलीच नाचक्की झाली होती.
2007 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला फेव्हरेट मानलं जात होतं. लीग स्टेजमध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि बरमुडा हे संघ एका गटात होते. त्यामुळे बाद फेरीत टीम इंडिया सहज पोहोचेल असं गणित होतं. पण झालं भलतंच. बांगलादेशने भारताला पराभूत करताच सर्व गणित बिघडून गेली. श्रीलंकेनंही पराभवाचं पाणी पाजलं. त्यामुळे राहुल द्रविड, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंह यासारख्या दिग्गज खेळाडूंना पराभव पचवावा लागला.
या पराभवला आता 16 वर्षे उलटून गेली आहेत. तेव्हाचा कर्णधार आता टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी आहे. त्यामुळे रोहित सेनेला पराभवाचा बदला घेण्याची नामी संधी आहे. यात 2007 वनडे वर्ल्डकप, आशिया कप 2023, डिसेंबर 2022 मधील द्विपक्षीय मालिका यांचा समावेश आहे. डिसेंबर 2022 मध्ये टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर गेली होती. तेव्हा मालिका 2-1 गमावली होती. मागच्या 4 वनडे सामन्यात बांगलादेशने टीम इंडियाला 3 वेळा पराभूत केलं आहे.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत केलं तर उपांत्य फेरीचं गणित सोपं होणार आहे. तसेच गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राहणार आहे. टीम इंडियाने या स्पर्धेत सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं पारडं जड आहे.