गेल्या काही दिवसांपासून स्टार खेळाडूंनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. काही तासांआधी विल पुकोव्स्की आणि शॅनन गॅब्रिएल यांनी निवृत्ती जाहीर केलेली. तर टीम इंडियाचा स्टार खेळाडू शिखर धवन यानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. अशातच आणखी एका भारतीय खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या नेतृत्त्वाखाली डेब्यू केलेल्या या खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वयाच्या 31 व्या वर्षी खेळाडूने निवृत्ती घेतल्याने क्रिकेट वर्तुळात त्याची चर्चा होत आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत या खेळाडूने निवृत्ती जाही केली आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून बरिंदर सरन आहे. 2016 साली टीम इंडियाकडून त्याने पदार्पण केलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याने सुरूवात केली होती. त्यानंतर 2016 लाच टी-20 क्रिकेटमध्येही झिम्बाब्वेविरुद्ध त्याने डेब्यू केला होता.
मी अधिकृतपणे क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. या प्रवासासाठी सर्वांचा मनापासून आभारी आहे. 2009 मध्ये बॉक्सिंगमधून क्रिकेटकडे स्विच केले त्यानंतर क्रिकेटने खूप सारे अविश्वसनीय अनुभव दिले. आयपीएल फ्रँचायझींनी दरवाजे उघडले, त्यानंतर 2016 मध्ये भारताचे प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. माझे करियर लहान असले तरीसुद्धा आठवणी कायम लक्षात राहणाऱ्या आहेत. माझ्या या प्रवासामध्ये मला कोच आणि मॅनेजमेंटचा कायम ऋणी आहे. क्रिकेटने मला दिलेल्या संधींबद्दल मी कृतज्ञ आहे. शेवटी म्हटल्याप्रमाणे आकाशाप्रमाणे स्वप्नांनाही मर्यादा नसतात, म्हणून स्वप्न पहात राहा, अशी भावनिक पोस्ट बरिंदर सरन याने केली आहे.
दरम्यान, बरिंदर सरन याने आपल्या करियरमध्ये 6 वन डे आणि 2 टी-20 सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 7 आणि 6 विकेट घेतल्यात. आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल्स या चार संघांकडून खेळला. आयपीएलमध्ये 24 सामने खेळत त्याने 18 विकेट घेतल्या होत्या.