टीम इंडिया मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. तर त्यानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. त्याआधी टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. आर अश्विन याच्यानंतर टीम इंडियाच्या आणखी एकाने तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुण एरॉन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. वरुण काही महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये रेड बॉल क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानंतर आता गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.
वरुण एरॉन याने 2011 साली महेंद्रसिंह धोनी याच्या नेतृत्वात पदार्पण केलं होतं. वरुणने टीम इंडियाचं 9 वनडे आणि 9 टेस्ट मॅचमध्ये प्रतिनिधित्व केलं. वरुणने या एकूण 18 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या होत्या. वरुण त्याच्या वेगासाठी परिचित होता. मात्र वरुणला दुखापतीमुळे सातत्याने खेळता आलं नाही. वरुणचं दुखापतीमुळे टीममधून इन-आऊट सुरुच असायचं. वरुणने 2010-2011 या हंगामात विजय हजारे ट्रॉफीत सर्वांचं लक्ष वेधलं होतं. वरुणने तेव्हा 153 किमी वेगाने बॉल टाकला होता.
वरुणने मुंबईतील वानखेडे स्टेडियममधूनच एकदिवसीय आणि कसोटी पदार्पण केलं. वरुणने 23 ऑक्टोबर 2011 रोजी इंग्लंडविरुद्ध वनडे डेब्यू केला. तर 2 नोव्हेंबर 2014 साली अखेरचा एकदिवसीय सामना खेळला.वरुणने 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या. तर 8 धावा केल्या.
तसेच वरुणने 22 नोव्हेंबर 2011 रोजी विंडीज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं. तर 14 नोव्हेंबर 2015 ला वरुणने अखेरचा कसोटी सामना खेळला. वरुणच्या कसोटी कारकीर्दीतील हे शेवटचा सामना ठरला. वरुणने टेस्टमध्ये 18 विकेट्स घेण्यासह 35 धावाही केल्या.
वरुण एरॉनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Varun Aaron retired from International cricket. 🇮🇳 pic.twitter.com/58RNOtiaxI
— Johns. (@CricCrazyJohns) January 10, 2025
वरुणला त्याच्या कारकीर्दीत अनेकदा दुखापत आडवी आली. त्यामुळे वरुणला सातत्याने फार सामने खेळता आले नाहीत. मात्र वरुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. वरुणने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडसाठी चमकदार कामगिरी केली. वरुणने 66 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 173 विकेट्स घेतल्या. तर लिस्ट ए क्रिकेटमधील 87 सामन्यांमध्ये 141 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तसेच वरुणने 95 टी 20 सामन्यांमध्ये 93 विकेट्स मिळवल्या.