आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियामध्ये अनेक बदल पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर सूर्यकुमार यादव याला टी 20 संघाचा पूर्णवेळ कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. तर गौतम गंभीर याची हेड कोच म्हणून नियुक्ती झाली आहे. आता त्यात आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा दिग्गज माजी फलंदाज आणि एनसीए अर्थात राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख असलेले व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये संपणार आहे. अशात त्यांच्यानंतर ही जबाबदारी कोण सांभाळणार हे स्पष्ट झालं आहे.
इएसपीएन क्रिकेइन्फोच्या वृत्तानुसार, व्हीव्हीएस लक्ष्मण यांना मुदतवाढ मिळू शकते. लक्ष्मण यांचा कालावधी एक वर्षाने वाढवला जाऊ शकतो. बीसीसीआयने लक्ष्मणसह 3 वर्षांसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत करार केला होता. त्याआधी लक्ष्मण आयपीएलमधील एका टीमचे हेड कोच होणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र एनसीएची जबाबदारी असल्याने ते शक्य वाटत नाही.
दरम्यान आयसीसी टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाची युवा ब्रिगेड ही झिंबाब्वे दौऱ्यावर गेली होती. टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात 5 टी20i सामन्यांची मालिका पार पडली. झिंबाब्वेने विजयी सलामी देत टीम इंडियाला झटका दिला होता. मात्र त्यानंतर शुबमन गिल याच्या नेतृत्वात भारताने विजयी चौकार लगावला. टीम इंडियाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली. त्या झिंबाब्वे दौऱ्यात व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक होते.
व्हीव्हीएस लक्ष्मणने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. लक्ष्मणने 134 कसोटी आणि 86 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. लक्ष्मणने कसोटी क्रिकेटमध्ये 45.97 च्या सरासरीने 8 हजार 781 धावा केल्या आहेत. लक्ष्मणने कसोटी क्रिकेटमध्ये 56 अर्धशतकं आणि 17 शतकं ठोकली आहेत. तर लक्ष्मणने वनडे क्रिकेटमध्ये 30.76 च्या सरासरीने 2 हजार 338 धावा केल्या आहेत. लक्ष्मणने या दरम्यान 10 अर्धशतकं आणि 6 शतकं झळकावली आहेत. तसेच क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानतंर लक्ष्मणने काही दौऱ्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारीही पार पाडली आहे.