मुंबई | टीम इंडियाला 2011 नंतर वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलेलं नाही. यंदा 2023 ला होणाऱ्या आयसीसी वनडे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन होण्याची नामी संधी आहे. मात्र टीम इंडियाचे बरेचसे खेळाडू हे दुखापतीच्या कचाट्यात अडकलेले आहेत. टीम इंडियसमोर 4 वर्षांआधी जशी समस्या होती, तशी समस्या आताही उद्भवली आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याने भीती व्यक्त केली आहे. झहीर नक्की काय म्हणालाय हे आपण जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव हा सपशेल अपयशी ठरला. सूर्या तिन्ही सामन्यात पहिल्याच बॉलवर आऊट झाला. सूर्याला दुखापतीने त्रासलेल्या श्रेयस अय्यर याच्या जागी चौथ्या क्रमाकांवर संधी देण्यात आली होती. श्रेयस अय्यर याची दुखापत आणि सूर्याची निराशानजनक कामगिरी यामुळे टीम इंडियासमोर 4 वर्षांआधीसारखीच स्थिती असल्याचं झहीरला वाटतंय. टीम इंडियासमोर 2019 साली चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाबाबात अशीच डोकेदुखी होती.
टीम इंडियाला तेव्हा चौथ्या स्थानी खेळणाऱ्या फलंदाजाचा शोध घेण्यात अपयश आलं होतं. याचाच फटका टीम इंडियाला 2019 मध्ये वर्ल्ड कपमध्ये बसला होता. त्यामुळे यंदा वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला गेल्या वेळेप्रमाणे फटका बसू नये यासाठी आत्ताच चौथ्या स्थानावर लक्ष द्यावं, असं झहीर याला वाटतं.
श्रेयस टीममध्ये चौथ्या क्रमांकावर खेळतो. मात्र सूर्याला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटीत खेळता आलं नव्हतं. मात्र त्यानंतर श्रेयसने कमबॅक केलं. पण पुन्हा त्या दुखापतीने डोकं वर काढलं. परिणामी श्रेयसला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजमध्येही खेळता आलं नव्हतं. आता या दुखापतीमुळे श्रेयस याला जूनमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये मुकण्याची शक्यता आहे. यामुळे तिथेही सूर्यालाच श्रेयसच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान सूर्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये झिरोवर आऊट झाला. यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला. कहर म्हणजे तिन्ही सामन्यात सूर्या आपल्या खेळीतील पहिल्याच बॉलवर आऊट होत गोल्डन डक ठरला. यामुळे टीम इंडिया आणि मॅनेजमेंटचं टेन्श वाढलं आहे. त्यामुळे आता टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेतं याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.