मुंबई : भारतात क्रिकेट म्हंटलं की जीव की प्राण..घरातील प्रत्येक व्यक्ती भारताचा सामना असला की हातातलं काम सोडून सामन्या नजरा खिळवून ठेवतात. पण या क्रिकेट वेड्या देशात एक आयसीसी ट्रॉफी मिळवण्यासाठी धडपड सुरु आहे. गेल्या दहा वर्षांत भारतीय संघाला काही संधी मिळाल्या. पण त्या संधीचं सोनं करून घेण्यात टीम इंडियाला अपयश आलं. संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी पण अंतिम फेरीत पदरी निराशा पडल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे आयसीसी चषकाचा दुष्काळ कधी आणि केव्हा संपेल असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. मागच्या दहा वर्षात टीम इंडियाने एकूण 10 आयसीसी स्पर्धा खेळल्या. पण चषकावर नाव कोरण्यात अपयश आलं. 2013 नंतर टीम इंडियाने 2014 च्या अंतिम फेरीत जागा मिळवली होती. पण पराभवाचं तोंड पाहावं लागलं.
2015 मध्ये टीम इंडिया वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचली होती. टी20 वर्ल्डकप 2016 च्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली होती. 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं. त्यानंतर 2019 वनडे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. 2019-21 टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरीतही न्यूझीलंडने पराभूत केलं. भारतीय संघाला 2021 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या लीग फेरीतूनच गाशा गुंडाळावा लागला.
2022 टी20 वर्ल्डकच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने जागा मिळवली होती. पण इंग्लंडने भारताचं आव्हान संपुष्टात आणलं. त्यानंतर 2021-23 टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजलं. त्यानंतर 2023 वनडे वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. त्यामुळे आता भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी कधी जिंकणार असा प्रश्न आहे.
2024 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताकडून अपेक्षा आहेत. तर टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या टॉपमध्ये टीम इंडिया असून अंतिम फेरी गाठण्याची शक्यता आहे. तर 2025 आयसीसी चॅम्पियन स्पर्धेसाठी टीम इंडिया पात्र ठरली असून ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. तर 2026 टी20 वर्ल्डकप आणि 2027 साली वनडे वर्ल्डकप स्पर्धा असणार आहे.