मुंबई | टीम इंडियाच्या वेस्टइंडिज दौऱ्याची सुरुवात ही 12 जुलैपासून होणार आहे. बीसीसीआयने या दौऱ्यातील कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी शुक्रवारी 23 जून रोजी भारतीय संघाची घोषणा केली. या दोन्ही मालिकांमध्ये रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर वनडेत हार्दिक पंड्या आणि टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. बीसीसीआयने यो दोन्ही मालिकांसाठी अनेक युवा खेळाडूंना संधी दिलीय. मात्र चेतेश्वर पुजारा याच्यावर कारवाईचा बडगा उचललाय. पुजाराला कसोटी मालिकेतून वगळण्यात आलंय.
चेतेश्वर पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सपशेल फ्लॉप ठरला होता. त्यामुळे बीसीसीआयने पुजाराचा टीममधून पत्ता कट केलाय. मात्र त्यानंतर आता पुजाराला दुसऱ्या टीमकडून खेळण्याची ऑफर आली आहे. पुजारा दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसू शकतो. दुलीप ट्रॉफी 2023 स्पर्धेला येत्या 28 जूनपासून सुरुवात होणार आहे.
टीओयच्या वृत्तानुसार, चेतेश्वर पुजारा दुलीप ट्रॉफीत वेस्ट झोनकडून खेळणार आहे. चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव या दोघांची टीममध्ये राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. आता हे दोघे वेस्ट झोन टीममध्ये यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या दोघांची जागा घेणार आहेत. ऋतुराज आणि यशस्वी या दोघांची विंडिज दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या दोघांकडे पुजाराचा पर्याय म्हणून पाहिलं जात आहे.
यशस्वी आणि ऋतुराज हे दोघे सलामी फलंदाज आहेत. मात्र शुबमन गिल याच्या उपस्थितीत या दोघांपैकी एकालाही रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंगची संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. पुजारा कसोटीत तिसऱ्या क्रमांकावर खेळतो. कसोटी क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानाला महत्वाचं स्थान आहे. इथे ऋतुराज किंवा यशस्वी यांना संधी दिली जाऊ शकते.
दरम्यान दुलीप ट्रॉफी 2023 या स्पर्धेला 28 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत एकूण 6 संघ सामील होणार आहेत. वेस्ट झोन या स्पर्धेतील आपला पहिला सामना 5 जुलै रोजी खेळणार आहे. सेंट्रल झोन विरुद्ध ईस्ट झोन यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघाविरुद्ध वेस्ट झोन पहिला सामना खेळणार आहे.
पुजारा टीममधून वगळलं. त्यामुळे आता पुजाराला किती काळ बाहेर रहावं लागेल, हे निश्चित नाही.मात्र पुजारासाठी टीम इंडियाचे दरवाजे कायमचे बंद झालेले नाहीत. निवड समितीला पुजारा आणि ऋतुराजचा गेम पाहायचाय. त्यामुळे पुजाराची निवड करण्यात आलेली नाही. तसेच पुजाराने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये धावा केल्यास त्याची पुन्हा टीम इंडियात एन्ट्री होईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलंय. त्यामुळे आता पुजारा कशी कामगिरी करतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.
दुलीप ट्रॉफीसाठी वेस्ट झोन टीम | यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, प्रियांक पांचाळ (कॅप्टन), हार्विक देसाई (विकेटकीपर), पृथ्वी शॉ, हेत पटेल (विकेटकीपर), सरफराज खान, अर्पित वसावडा, अतित शेठ, शम्स मुलानी, युवराज डोडिया, धर्मेंद्र जडेजा, चेतन साकरिया, चिंतन गजा आणि अरझान नागवासवाला.