टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियात असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर पिंक कसोटीसाठी जोरदार तयारी सुरु आहे.दुसरीकडे, चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. त्यावरून जोरदार रणकंदन सुरु आहे. भारत सरकारने टीम इंडियाला पाकिस्तानात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. ही स्पर्धा कशी होणार यावरून चर्चांचे फड रंगले आहेत. असं असताना बीसीसीआयने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी भारतीय संघाची नवी जर्सी लाँच केली आहे. ही जर्सी वनडेसाठी असणार आहे. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मुंबईच्या कार्यालयात या जर्सीचं अनावरण केलं. यावेळी भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर उपस्थित होती. टीम इंडियाची ही जर्सी प्रसिद्ध जर्मन स्पोर्टवियर कंपनी एडिडासने तयार केली आहे. टीम इंडियाची मागची जर्सी पूर्ण निळी होती आणि खांद्यावर एडिडासच्या तीन पट्ट्या होत्या. वर्ल्डकप दरम्यान या पट्ट्यांना तिरंगी रंग देण्यात आला होता. यावेळेसही खांद्यावर एडिडासची तीन पट्ट्या आहेत. या पट्ट्यांना पांढरा रंग आहे पण त्याच्या मागे तिरंगी शेड आहे. तसेच निळा रंग थोडा मागच्या जर्सीपेक्षा लाईट आहे. पण खाकेत डार्क निळा रंग आहे.
ही जर्सी पुरूष संघ आणि महिला संघही घालणार आहे. महिला संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यानंतर डिसेंबर महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत महिला संघ पहिल्यांदाच नवी जर्सी घालणार आहे. दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तीन टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 15 डिसेंबरपासून टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईत होणार आहेत.
📍 BCCI Headquarters, Mumbai
Mr Jay Shah, Honorary Secretary, BCCI & Ms Harmanpreet Kaur, Captain, Indian Cricket Team unveiled #TeamIndia‘s new ODI jersey 👏 👏@JayShah | @ImHarmanpreet | @adidas pic.twitter.com/YujTcjDHRO
— BCCI (@BCCI) November 29, 2024
भारतीय पुरुष संघ जानेवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिल्यांदा जर्सी परिधान करणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही जर्सी परिधान करणार आहे. त्यानंतर फेब्रुवारी मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ हीच जर्सी परिधान करणार आहे. पुढील वर्षी भारतात महिला वनडे वर्ल्डकप होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया याच जर्सीत दिसेल.