आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा ही वनडे फॉर्मेटमध्ये आहे. 50 षटकांच्या सामन्यात सर्वच संघांची कसोटी लागणार आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात झाली होती. तेव्हा टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत अंतिम फेरी गाठली होती. पण आता भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. त्यामुळे भारताची दुबईच्या खेळपट्ट्यांवर कसोटी लागणार यात काही शंका नाही. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांची वनडे सामना खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाची तयारी अधोरेखित होणार आहे. पण ही मालिकाच नाही, तर दुबईत टीम इंडिया एक सराव सामना खेळणार आहे. हा सराव सामना भारताला तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. रिपोर्टनुसार, टीम इंडिया दुबईला गेल्यानंतर तिथे एक सराव सामना खेळणार आहे. पण हा सामना कोणासोबत असेल याबाबत काहीच कळालेलं नाही. दरम्यान, आयसीसी या सराव सामन्याचं आयोजन करणार आहे की बीसीसीआय ते मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
सराव सामना हा भारतासाठी जय पराजयापेक्षा दुबईच्या वातावरणात टीम इंडिया कशा कमी करते याकडे असणार आहे. त्यामुळे एका सराव सामन्यातच भारताचं स्पर्धेतील पुढची वाटचाल कळणार आहे. भारत इंग्लंड मालिका संपल्यानंतर या स्पर्धेसाठी फार काही दिवसांचा अवधी शिल्लक उरणार नाही. त्यामुळे एकच सराव सामना खेळावा लागणार आहे. दुसरीकडे, कर्णधार रोहित शर्माला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतचं संघाची बांधणी करावी लागणार आहे. ही मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे आणि 12 फेब्रुवारीला शेवटची वनडे आहे. मालिकेतील पहिला सामना वडोदरा, दुसरा कटक आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होईल. त्यानंतर टीम इंडिया दुबईला रवाना होईल.
आयसीसी चॅम्पियन्स 2025 स्पर्धा 19 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशशी होणार आहे. टीम इंडिया असलेल्या ग्रुपमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. भारत पाकिस्तान सामना 23 फेब्रुवारीला आणि 2 मार्चला न्यूझीलंड भारत सामना असेल. या गटातून टॉप दोन संघ उपांत्य फेरीत स्थान मिळवतील. भारताने उपांत्य आणि अंतिम फेरी गाठली तर सर्वच्या सर्व सामना दुबईत होतील.