मुंबई | टीम इंडियाने राजकोटमध्ये इंग्लंडवर तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी 434 धावांनी मात करत सर्वात मोठा विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. मुंबईच्या सरफराज खान याने तिसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण केलं. सरफराज खान याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करत दिग्गजांच्या रांगेत स्थान मिळवलं. आता सामन्याच्या काही तासांनंतर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे.
आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक करत छाप सोडणाऱ्या खेळाडूने तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. या खेळाडूचा दुर्देवाने पहिलाच सामना हा अखेरचा ठरला आहे. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये विदर्भाचं प्रतिधिनित्व करणारा आणि टीम इंडियासाठी एकमेव सामना खेळलेल्या खेळाडूने क्रिकेट विश्वाला रामराम केलं आहे. फैझ फजल याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. फैझने इंस्टाग्रामवर पोस्ट करत आपल्या निर्णयाबाबत सर्वांना माहिती दिली.
फैझने 18 फेब्रुवारी रोजी इंस्टा पोस्ट केली. “उद्या एका युगाचा अंत होणार आहे, कारण मी 21 वर्षांपूर्वी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. मी नागपूरच्या मदैानात शेवटचा उतरणार आहे. इथवरचा प्रवास हा अविस्मरणीय असा होता. या आठवणी माझ्या मनात कायम रुंजी राहतील. सहकारी खेळाडू, प्रशिक्षक, फिजीओ, ट्रेनर आणि ग्राउंड स्टाफ या सर्वांचा मी आभारी आहे”, अशा शब्दात फैझने आपल्या 21 वर्षांच्या प्रवासाला उजाळा देत सर्वांना धन्यवाद दिले.
फैझ फझलने टीम इंडियासाठी एकमेव वनडे सामना खेळला. फैझने 2016 साली झिंबाब्वे विरुद्ध एकदिवसीय पदार्पण केलं होतं. फैझने पदार्पणात अर्धशतक केलं होतं. फैझने 55 बॉलमध्ये 61 धावांची खेळी केली होती. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला. फैझला त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळण्याची संधी मिळालीच नाही.
फैझ फझलची इंस्टा पोस्ट
तर दुसऱ्या बाजूला फैझची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कामगिरी ही ‘फर्स्ट क्लास’ राहिली. फैझने 137 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 9 हजार 193 धावा केल्या. फैझने या दरम्यान 24 शतकं आणि 39 अर्धशतकं लगावली. तसेच 113 लिस्ट ए सामन्यात त्याने 10 शतकं आणि 22 अर्धशतकांच्या मदतीने 3 हजार 641 धावा केल्या. फझल प्रतिभावान खेळाडू होता. मात्र त्याला त्याच्या कर्तुत्वानुसार टीम इंडियात संधी न मिळाल्याने अखेर त्याने थांबण्याचा निर्णय घेतला.