T-20 वर्ल्ड कपवर नाव कोरल्यावर टीम इंडिया मायदेशी परतली आहे. मरीन ड्राईव्हवर चाहत्यांनी केलेलं टीम इंडियाचं जंगी स्वागत संपूर्ण जगाने केलं. या विजयी रॅलीनंतर आज टीम इंडियातील महाराष्ट्राच्या चार खेळाडूंचा विधानसभेत सत्कार करण्यात आला. राज्य सरकारकडून प्रत्येक खेळाडूला 1 कोटी बक्षीस म्हणून देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभेमध्ये भाषण करताना सुर्यकुमार यादवने पुढील वर्ल्ड कपबाबत मोठी घोषणा केली. त्यासोबतच नेमका कॅच कसा पकडला हे सभागृहात दाखवलं.
मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद त्यांनी आम्हाला ही संधी दिली. सर्वांना भेटून खूप चांगलं वाटत आहे. जे मी काल मरीन ड्राईव्हला पाहिलं ते विसरु शकत नाही आणि आजही जो काही सत्कार होत आहे तोही विसरू शकत नाही. माझ्याकडो बोलायला शब्द राहिले नाहीत, सर्वांचे मनापासून धन्यवाद. कॅच माझ्या हातात बसल्याचं सुर्याने सांगितलं आणि अॅक्शन करून दाखवली. मी काल पाहिलं मुंबई पोलिसांनी जे काही करून दाखवलं ते मला वाटत नाही कोणी करू शकेल. आशा आहे आम्हाला अशीच प्रेरणा मिळेल आपण लवकरच आणखी एक वर्ल्ड कप नावावर करू, असं सुर्यकुमार यादव म्हणाला.
पाहा व्हिडीओ:-
टीम इंडियाच्या खेळाडूंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चारही खेळाडूंसह सर्व संघाचं अभिनंदन केलं. आपल्या भाषणामध्ये आता इथून पुढे टी-20 सामना पाहतना रोहितची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. भारतीयही त्याची आठवण काढल्याशिवाय राहणार नाहीत, असं अजित पवार म्हणाले.
टीम इंडियाने पाकिस्तानला हरवलं तेव्हा आपण अर्धा वर्ल्ड कप जिंकला होता. देशातील प्रत्येकजण वर्ल्ड कप जिंकल्यापासून जल्लोष करत आहेत. अरबी समुद्राच्या बाजूला एक महासागर होता. मरीन ड्राईव्हला पाहिलेली गर्दी पाहून आम्हाला धडकी भरली होती. मुंबई पोलिसांना अशा गर्दीवर नियंत्रण करण्याची सवय असल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी पोलिसांचं कौतुक केलं.